आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Discussion On Irrigation Denied In Vidhan Parishad

सिंचनाने गाजवला दिवस, विधान परिषदेत चर्चेला परवानगी नाकारली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सिंचन भ्रष्टाचारावर विरोधकांनी उपस्थित केलेल्या चर्चेने विधान परिषदेचा तिसरा दिवस शुक्रवारही वादळी ठरला. न्यायप्रविष्ट विषयांची चर्चा करता येते की नाही यावर सत्ताधारी आणि विरोधकांत तीव्र मतभेद उद्भवले आहेत. ‘या मुद्द्यावर सभापती मुस्कटदाबी करत आहेत,’ असा आरोप करत विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार घातला होता.

नियम 260 अन्वये विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी बुधवारी सिंचन भ्रष्टाचारावर प्रस्ताव दाखल केला होता. सभापती शिवाजीराव देशमुख यांनी प्रस्ताव दाखल करून घेतला, परंतु सिंचन भ्रष्टाचार प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे या विषयावर चर्चा करायची की नाही याबाबत उद्या निर्णय देऊ, असे जाहीर केले होते. गुरुवारी प्रश्नोत्तरांच्या तासानंतर सिंचन भ्रष्टाचारावर विरोधक बोलण्यास उभे राहिले, परंतु ताकीद देऊनही विरोधक न्यायप्र्रविष्ट बाबी उपस्थित करत असल्याने उपसभापतींनी चर्चा थांबवली होती. शुक्रवारी विरोधकांनी पुन्हा या विषयावर चर्चा उपस्थित केली. या प्रस्तावाला सभापतींनी अनुमती नाकारली आहे. त्यामुळे सिंचन भ्रष्टाचारावर विरोधकांना बोलता येणार नाही, असा मुद्दा सत्ताधारी सदस्यांनी उपस्थित केला. दोन्ही बाजूंचे सदस्य आपापला मुद्दा तावातावाने मांडू लागले. या गोंधळात उपसभापती वसंत डावखरे यांनी महसूलमंत्र्यांना निवेदन करण्यास सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना, भाजपच्या सदस्यांनी निषेधाच्या घोषणा देत सभात्याग केला.

आताच आक्षेप का?
कितीतरी न्यायप्रविष्ट विषयांवर पूर्वी चर्चा झाली आहे. मग सिंचन भ्रष्टाचारावरील चर्चेला आक्षेप का, असा सवाल विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी या वेळी केला. विरोधकांची मुस्कटदाबी करत शासन सिंचनातील भ्रष्टाचार दडपू पाहत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

विरोधकांविना कामकाज
विरोधकांनी सभात्याग केल्यानंतरही परिषदेचे कामकाज चालूच राहिले. सभागृहात विरोधक नसताना तीन विधेयके मंजूर करण्यात आली. तसेच दोन लक्षवेधी सूचनावर चर्चा पार पडली.