आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादची महापालिका बरखास्त करा : नवाब मलिक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून सत्तेत येणा-या शिवसेना व भाजपने त्यांच्या नावे असलेले औरंगाबाद येथील पुराणवस्तू संग्रहालय महापालिकेच्या माध्यमातून गहाण ठेवण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यामुळे ही महापालिका बरखास्त करावी, अशी मागणी मंगळवारी राष्ट्रवादीतर्फे करण्यात आली. ऐतिहासिक वस्तू गहाण ठेवण्याचा प्रस्ताव मांडणे हा जनतेचा अपमान असल्याचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.

औरंगाबाद महापालिकेमध्ये गेली 18 वर्षे शिवसेना-भाजपची सत्ता आहे. मात्र त्यांच्या बेशिस्त कारभारामुळे आणि चुकीच्या धोरणांमुळे पालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. त्यामुळेच शहरातील अर्धवट रस्ते, समांतर जलवाहिन्या, थकीत वीज बिले, कर्मचा-यांचे वेतन या खर्चासाठी पालिकेकडे निधी शिल्लक नाही. तसेच विविध ठेकेदारांचे 60 कोटी रुपये थकीत आहेत. त्यासाठी 200 कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यासाठी आपल्या ताब्यातील 300 कोटी रुपयांच्या 29 मालमत्तांचे मूल्यांकन पालिकेने केले. यामध्ये बालउद्यान व शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाचाही समावेश असल्याचे मलिक म्हणाले.

तावडेंचे बेजबाबदार विधान
गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षाकडून प्रसिद्धीसाठी राज्य सरकारला बदनाम करण्याचे षड्यंत्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे करीत आहेत. त्यामुळेच त्यांनी सिंचन घोटाळ्याशी संबंधित एसआयटीकडे काही व्यक्तींच्या उलटतपासणीची मागणी केली, असा आरोप मलिक यांनी केला.

दिशाभूल करण्याचा प्रयत्न
एसआयटीच्या कार्यकक्षेमध्ये महामंडळाने सुधारित मान्यता दिलेल्या प्रकल्पांच्या किमतीची वाढ व त्याची कारणे प्रचलित नियमानुसार व अधिकारानुसार असल्याची तपासणी करणे, विलंबाची कारणे तपासणे, प्रकल्प मुदतीत पूर्ण करण्यासाठी उपाययोजना सुचवणे, अनियमितता झाल्यास त्याबाबत जबाबदारी निश्चित करणे व योग्य कार्यवाही सुचवणे आदी महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. या कार्यकक्षा तावडे यांना माहीत असूनही त्यांनी चितळे यांना पत्र लिहून माहितीच्या अधिकारामध्ये मिळालेल्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करणा-या व्यक्तींची उलटतपासणीची इच्छा व्यक्त केली. तसेच अधिका-यांची चौकशी करण्याचे अधिकार आहेत का, असेही विचारले. कार्यकक्षेत हे बसत नाही, असे चितळे यांनी स्पष्ट केल्यावरही तावडे जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप मलिक यांनी केला.