आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • District Bank Elections: BJP Captured Mumbai Bank

जिल्हा बँक निवडणूक: मुंबैत भाजपने उडवला शिवसेना पॅनलचा धुव्वा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विरोधकांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि खुद्द उद्धव ठाकरेंनी मुंबई बँकेच्या निवडणुकीत घेतलेला रस या सगळ्या पार्श्वभूमीवर विद्यमान अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी मुंबई जिल्हा सहकारी बँक म्हणजे मुंबै बँकेवर पुन्हा एकदा आपले वर्चस्व राखले आहे. भाजप पुरस्कृत सहकार पॅनेल आणि शिवसेना पुरस्कृत शिवप्रेरणा पॅनेल यांच्यातच थेट लढत असल्याने या निवडणुकीला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले होते. २१ पैकी तब्बल १७ जागा जिंकत भाजपने शिवसेनेचा धुव्वा उडवला आहे.

मुंबै बँकेवर गेली दहा वर्षे प्रवीण दरेकर यांचे असलेले एकहाती वर्चस्व मोडून काढण्याच्या ईर्षेने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शिवसेनेचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपवर कुरघोडी करण्यासाठी शिवसेनेने आपली सारी ताकद पणाला लावली होती. शिवाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही पत्र पाठवून मतदारांना शिवसेनेच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले होते. २१ पैकी अवघ्या ४ जागांवर विजय मिळाल्याने शिवसेना पुरस्कृत शिवप्रेरणा पॅनेलला मोठा पराभव पाहावा लागला आहे.

"आमच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप निराधार होते हे मतदारांनी दाखवले आहे. सहकाराचा विजय झाला आहे. विरोधकांनी काय आरोप करायचे हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र मतदारांनीही विरोधकांना त्यांची जागा दाखवली आहे,'
अशी प्रतिक्रिया विजयानंतर प्रवीण दरेकर यांनी दिली.

पुढे वाचा, नारायण राणेंचे वर्चस्व काेकणात कायम
नारायण राणेंचे वर्चस्व काेकणात कायम
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत नारायण राणे यांच्या संकल्पसिद्धी पॅनलला १७ जागांवर विजय मिळाला. तर शिवसेना-भाजपच्या सहकार वैभव पॅनलला अवघ्या दोन जागा मिळाल्या आहेत.

नगर बँकेवर थोरातांचे वर्चस्व, विखेंना धक्का
नगर | नगर जिल्हा बँकेवरील सत्ता कायम ठेवण्यात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना काठावर का होईना यश मिळाले. चुरशीच्या निवडणुकीत थोरात गटाने काँग्रेसचेच नेते राधाकृष्ण विखे यांना धोबीपछाड दिली. थोरात यांच्या गटाला ११ तर भाजप-शिवसेनेशी युती केलेल्या विखेंच्या पॅनलला ९ जागा मिळाल्या. एक अपक्ष उमेदवार विजयी झाले अाहेत.

जयंत पाटलांचे वर्चस्व, पतंगरावांना धक्का
सांगली | राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयंत पाटील यांच्या पॅनलने २१ पैकी १५ जागा जिंकत जिल्हा बँकेत वर्चस्व राखले; मात्र माजी मंत्री मदन पाटील यांचा पराभव झाला. काँग्रेसचे माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या पॅनलला सहा जागा मिळाल्या. या निवडणूकीत माजी मंत्री पतंगराव व जयंतराव आमने-सामने आले होते. तसेच वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातही फूट पडली हाेती. मदन पाटील यांचा पुतण्याकडून पराभव झाला.

खडसेंची कन्या होणार अध्यक्ष
जळगाव | जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महसूलमंत्री एकनाथ खडसेंच्या नेतृत्वातील सहकार पॅनलची सत्ता अाली अाहे. २१ पैकी १८ जागा खडसेंच्या गटाने राखल्या अाहेत. यापूर्वी खडसे व इतर पक्षीय संचालकांच्या पाठिंब्यावर शिवसेना या बँकेत सत्तेवर होती. अाता खडसेंची एकहाती सत्ता आल्याने बँकेच्या अध्यक्षपदासाठी त्यांच्या कन्या रोहिणी यांचे नाव जवळपास निश्चित झाले अाहे. धुळ्यात अाघाडीचेच वर्चस्व : भाजपचे एक खासदार व चार अामदार तर कॉंग्रेसच्या सात अामदारांनी एकमेकांविराेधात रणशिंग फुंकून प्रतिष्ठेच्या बनविलेल्या धुळे जिल्हा बँकेवर अखेर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व कायम ठेवले. कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या पॅनलला १६ जागांवर विजय मिळाला. तर भाजपच्या पॅनलला केवळ धुळे तालुका विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघाची एकमेव जागा राखता अाली. खासदार डॉ. सुभाष भामरे व अामदार जयकुमार रावल यांना दोन्ही जिल्ह्यांतून फारशी मते मिळाली नाही.

उदयनराजे विजयी, पॅनल पराभूत
सातारा | सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी १८ जागांवर राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केले. दोन जागांवर अपक्ष, तर एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. सात उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आल्यामुळे २१ पैकी १४ जागांसाठी मतदान झाले. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मात्र निंबाळकरांविरोधात पॅनल टाकल्याने चुरस होती. निंबाळकर व भोसले या राष्ट्रवादीच्याच नेत्यांत वाक‌्युद्धही रंगले होते. मात्र, स्वत: बिनविरोध निवडून आल्यानंतर उदयनराजेंनी या निवडणुकीतून अंग काढून घेतले व ही निवडणूक एकतर्फीच झाली.