आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलनात सीमावासीयांचा विसर : रावते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - घुमान येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दरवर्षीप्रमाणे यंदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात राहणार्‍या मराठी बांधवांच्या लढ्याला बळ देण्यासाठीचा पाठिंब्याचा प्रस्ताव न आल्याबद्दल शिवसेनेने टीकेचा सूर लावला आहे. ‘एकही मराठी माणूस नसलेल्या ठिकाणी हे संमेलन भरवले याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करावे लागेल, मात्र त्याच वेळी यंदा आयोजकांना सीमाभागात राहणार्‍या दहा लाख मराठी भाषकांचा विसर कसा पडला?’ असा सवाल शिवसेनेचे नेते व परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी रविवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे विचारला आहे.

दरवर्षी संमेलनात सीमावर्ती भागातील मराठी बांधवांच्या लढ्याला बळ देण्यासाठी पाठिंब्याचा ठराव केला जात असतो. मात्र ही प्रथा यंदा खंडित झाली आहे. ही अतिशय दु:खदायक आणि मनाला वेदना देणारी बाब असल्याचे शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

बाळासाहेब ठाकरेंचाही विसर
साहित्य संमेलनात उद्घाटनापासून समारोपापर्यंत प्रत्येक वक्त्याने पंजाब आणि महाराष्ट्राच्या स्वभाव एकरूपतेचे म्हणजेच मर्दानगीचे गुण गायले. स्वातंत्र्य लढ्यातील समर्पणाचाही त्यात उल्लेख होता. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर देशभरात शिखांचे मोठ्या प्रमाणावर शिरकाण होत असताना मुंबई आणि महाराष्ट्रात मात्र हा समाज सुरक्षित राहिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या एका हाकेने मुंबई आणि महाराष्ट्रात शिखांचे संरक्षण झाले. मात्र याबद्दल एकाही वक्त्याने संमेलनात शिवसेनाप्रमुखांचा उल्लेख न केल्याबद्दलही रावते यांनी खंत व्यक्त केली आहे.