आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divakar Ravate Vidarbha Statement Issue Legislative Assembly

'जय विदर्भ'वाल्यांनी चालते व्हावे, रावतेंच्या वक्तव्याने विरोधक आक्रमक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘हे अखंड महाराष्ट्राचे सभागृह आहे. येथे स्वतंत्र विदर्भाची मागणी, जय विदर्भचा जयघोष चालणार नाही. ज्यांना असे बोलायचे असेल त्यांनी बाहेर बोलावे,’ असे वक्तव्य परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केल्यानंतर गुरुवारी विधान परिषदेत गदारोळ झाला. विदर्भातील विरोधी सदस्य आक्रमक झाले, तर सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी संयमाने विरोध केलाच, त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

डॉ. केळकर समितीच्या अहवालावर चाललेल्या चर्चेत हस्तक्षेप करताना औचित्याच्या मुद्द्याद्वारे रावते यांनी अशा आशयाचे वक्तव्य केले. त्यामुळे विदर्भातील काँग्रेसचे आमदार माणिकराव ठाकरे, राजेंद्र मुळक, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रा. जोगेंद्र कवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश गजभिये आदी सदस्य आक्रमक झाले. अनेक सदस्य आपली आसने सोडून पुढे येत घोषणा देऊ लागले. रावते यांच्यासोबत शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे त्यांना विरोध करत होत्या.

‘मंत्री हे शासन आहे. सरकार म्हणून त्यांनी ही भूमिका व्यक्त केली आहे. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी यावर त्यांची नेमकी भूमिका काय हे स्पष्ट करावे’, अशी मागणी माणिकराव ठाकरे यांनी केली. हे सर्व चालले असतानाच विरोधी पक्षांचे सदस्य आक्रमकच होते. तालिका सभापती रामनाथ मोते सदस्यांना शांत राहण्याचे वारंवार आवाहन करत होते; पण सदस्यांचा गोंधळ सुरूच होता.

भाजपची कानउघाडणी करा : धनंजय मुंडे
वेगळा विदर्भ देऊ ही भाजपची पहिल्यापासून भूमिका आहे. निवडणुकीतही होती, आजही ती कायम आहे. मग, रावतेंनी विरोधी पक्षांच्या सदस्यांची कानउघाडणी करण्यापेक्षा ते ज्यांच्यासोबत सत्तेत आहेत, त्यांची कानउघाडणी करावी, असा टोला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला.

तर मग सत्तेमधून बाहेर पडा : कपिल पाटील
भाजपची वेगळ्या विदर्भाची भूमिका मान्य नसल्यास सदस्यांना सभागृहाबाहेर जाण्यास सांगण्यापेक्षा रावते यांनी आधी सरकारमधून बाहेर पडावे, असे कपिल पाटील म्हणाले. त्यामुळे तणाव वाढला; पण नंतर मोते यांनी केळकर समितीच्या अहवालावरच चर्चा करण्याचे सक्त निर्देश दिल्याने वातावरण शांत झाले.