आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉरा जगातील सर्वाधिक चर्चित घटस्फोट तज्ज्ञ वकील, ‘कम्प्लिट डिव्होर्स सोल्युशन’ अशी ओळख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रसिद्ध हॉलीवूड कलाकार अँजेलिना जोली आणि ब्रॅड पीटच्या घटस्फोटाची सध्या बरीच चर्चा आहे. या प्रकरणामुळे लॉरा वॉजेर या महिला वकीलही पुन्हा चर्चेत आहेत. अँजेलिनाने तिच्या घटस्फोटाचा खटला लढण्यासाठी लॉरा यांची नियुक्ती केली आहे. २००३ मध्ये अँजेलिना आणि बिली बॉब थार्नटन घटस्फोट प्रकरणातही लॉरा यांनीच अँजेलिनाची बाजू मांडली होती. लॉरा सुनावणीपेक्षा अधिक भर तडजोडीवरच देतात. त्यामुळेच नुकताच जॉनी डॅप आणि अँम्बर हर्ड यांच्यातील घटस्फोटही त्यांनी अगदी सहजतेने घडवून आणला. अँम्बरने पती जॉनीवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. सेलिब्रिटींचे घटस्फोट आणि तडजोडीसाठी लॉरा प्रचंड प्रसिद्ध आहेत. म्हणूनच त्यांना “हॉलिवूडमधील कम्प्लिट डिव्होर्स सोल्युशन आणि डीसो क्वीन (डिसल्यूशन ऑफ मॅरेज)’ उपाधीने ओळखले जाते.

श्रीमंत आणि चर्चित घटस्फोटांच्या खटल्यांत पारंगत लॉरा तासाभराच्या समुपदेशनासाठी ८५० डॉलर आणि वकिलीसाठी २५ हजार डॉलर इतके घसघशीत शुल्क घेतात. त्यांचा एकही ग्राहक १० दशलक्ष डॉलरच्या खाली नसतो. सर्वच सेलिब्रटी लॉरा यांचा कणखरपणा, संयम, भावनिक संघर्षातील त्यांची साथ आणि २४ तास चालणाऱ्या सेलिब्रटी बातम्या चक्राला समजून घेण्याच्या क्षमतेचे चाहते आहेत. गॉसिप संकेतस्थळांना चकवण्याचे लॉरा यांच्याकडे अनेक फंडे असल्यामुळेच वॉजेर यांच्याकडील सेलिब्रिटी ग्राहकांची संख्या मोठी आहे. यात स्टीव्ह वाँडेर, ब्रिटनी स्पिअर्स, वेन स्टेफनी, जेनिफर गार्नर, मेलाने ग्रिफिथ, मारिया श्रीव्हर (अर्नाल्ड श्वेजनेगरची पत्नी) आणि किम कर्दाशिया, कोल कर्दाशिया आणि तिची आई क्रिस जेनर यांचाही समावेश आहे. सेलिब्रिटीचे घटस्फोट घडवून आणण्यात त्यांचा हातखंडा आहे. लॉरा यांचे वडील डेनिस एम. वॉजेर हेसुद्धा सेलिब्रिटी घटस्फोट प्रकरणाचे तज्ज्ञ वकील आहेत. त्यांच्या ग्राहकांच्या यादीत टॉम क्रुज, स्टीव्हन स्पीलबर्ग, जेनिफर लोपेजसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. २००४ मध्ये द मिरर या नियतकालिने डेनिस यांना “अमेरिकाज मोस्ट फिअर्ड डिव्होर्स लॉयर’ संबोधले होते. लॉरा यांच्या या वकीलीची सुरूवात तशी स्वत:च्याच घटस्फोटाने झाली. कॅलिफोर्निया विद्यापीठातून विधी पदवी मिळवल्यानंतर लॉरा १९९५ मध्ये वडीलांच्या “ कूपरमॅन अँड मँडलेस’ या विधी कंपनीत रुजू झाल्या. आधी त्यांना घटस्फोट प्रकरणे लढायची नव्हती. अपंगाच्या अधिकारांसाठी काम करायचे होते. दरम्यान, त्यांचे पतीशी खटके उडायला लागले. तेव्हा वडीलांनी त्यांना स्वत:च हे प्रकरण सांभाळण्याचा सल्ला दिला. याप्रकारे लॉरा यांनी सर्वप्रथम स्वत:चाच घटस्फोट घडवून आणला. २००१ मध्ये त्यांना स्टीव्ह वाँडेरच्या रुपात पहिल्यांदाचा मोठ्या सेलिब्रिटीचा खटला मिळाला. वाँडेरच्या लिव्ह इन पार्टनरने ३० दशलक्ष डॉलरचा दावा ठोकला होता. तेव्हापासून आतापर्यंत त्यांना अशी प्रकरणे लढण्याचा २५ वर्षांचा अनुभव असून या अनुभवांच्या आधारे त्यांनी “इट डझन्ट हॅव्ह टू बी दॅट वे: हाऊ टू डिव्होर्स विदाऊट डिस्ट्राँइंग यूअर फॅमिली अँड बँकरप्टिंग युअरसेल्फ’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यांच्या मते, लग्न मोडताना सर्वांच्या चिंता, दु:ख आणि संताप सारखाच असतो. यंदा माझ्यासोबत ऑस्करच्या रेडकार्पेटवर कोण चालणार? किंवा कार्यालयात ख्रिसमस कोण साजरा करेल? अशी काहींची चिंता असते.

सेलिब्रिटींच्या घटस्फोटांचे खटले लढले
स्टीव्ह वाँडेर, ब्रिटनी स्पिअर्स, वेन स्टेफनी, जेनिफर गार्नर, मेलाने ग्रिफिथ, मारिया श्रीव्हर (अर्नाल्ड श्वेजनेगरची पत्नी) आणि किम कर्दाशिया, कोल कर्दाशिया आणि तिची आई क्रिस जेनर यांच्या घटस्फोटाचे खटले लॉरा यांनी लढले आहेत.

तडजोड व्यवस्थापनात हातखंडा
लॉरा सुनावणीवर अधिक भर देत नाहीत. तडजोड करून आपल्या स्तरावरच प्रकरण मिटवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. शिवाय, सेलिब्रिटींच्या बातम्या माध्यमांत न येऊ देण्यात त्या पारंगत आहेत. दरम्यान, काय बोलावे आणि नाही? याचे मार्गदर्शनही त्या ग्राहकांना करतात.
बातम्या आणखी आहेत...