आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Analysis : शिवसेनेसह विरोधक अस्वस्थ, तर भाजप मात्र निश्चिंत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मध्यावधी निवडणुकांची पुडी भाजपकडून पद्धतशीरपणे सोडण्यात आली  आणि शिवसेनेसह सर्वच विरोधी पक्ष कंबर कसून मध्यावधीच्या कामाला लागले. विरोधी पक्षांची अस्वस्थता पाहून भाजप मात्र याचा आनंद घेत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळेच काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेवर हल्ला करीत आहेत आणि शिवसेनाही त्यांना उत्तर देत आहे. मध्यावधीच्या चाहुलीने शिवसेनेने संघटनात्मक बांधणीवर जोर दिला असून यासाठीच शिवसंपर्क अभियान राबवण्यास सुरुवात केली आहे.   

शिवसेना सत्तेत असली तरी विरोधकांचीच भूमिका बजावत असताना दिसून येत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना सत्तेवर आली खरी; परंतु भाजपने त्यांच्या नाकी नऊ आणले होते. केवळ दोन जागांनीच शिवसेना पुढे गेली, त्यामुळे भाजपची ताकद वाढल्याचेच दिसून आले. मुंबईतील मतदारांनी भाजपला भरभरून मते दिल्याने शिवसेना नेते विचारात पडले आहेत. शिवसेनेची ताकद पुन्हा वाढवण्यासाठी शिवसेना प्रयत्न करीत असून त्याचाच भाग म्हणून भाजपवर टीका केली जात असल्याचे समजते. दिल्लीत एनडीएच्या बैठकीत उद्धव ठाकरे उपस्थित राहिले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास असल्याच्या पत्रावर सहीही केली. असे असताना पुन्हा भाजप आणि पंतप्रधानांवर टीका सुरू केली. रामविलास पासवान यांनी उद्धव ठाकरे यांच्या या पवित्र्यावर चांगलीच टीका केली आणि उद्धव ठाकरे असे का करतात, असा प्रश्न उपस्थित केला.   
 
यानंतरही उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना निवडणुकांसाठी तयार राहा, असे आदेश दिले. त्यावरून शिवसेनेने निवडणुकांची तयारी सुरू केल्याचे दिसून आले. शिवसेना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपवर टीका करीत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेलाच कोंडीत पकडले आहे. शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे, असे अशोक चव्हाण यांनी म्हणताच शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी प्रथम राहुल गांधी यांना झोपेतून जागे होण्यास सांगा, असा पलटवार काँग्रेसवर केला. एकूणच आता विरोधी पक्षांमध्येच युद्ध सुरू झाले आहे.   
 
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेच्या टीकेबाबत बोलताना सांगितले, भाजपची वाढती ताकद पाहून शिवसेनेत अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भाजपपेक्षा जास्त जागा आणण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे. परंतु याचा फटका भाजपला बसणार 
नसून काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाच बसणार आहे. 
 
शिवसेना भाजपची मते घेणार नसून काँग्रेस राष्ट्रवादीच्याच मतांवर डल्ला मारणार आहे. त्यामुळे त्यांच्यातच खरी लढाई सुरू झाली आहे. भाजप आपली ताकद वाढवण्याचा योग्यरीत्या प्रयत्न करीत आहे आणि भाजपच यापुढेही क्रमांक एकचा पक्ष राहील, असेही या नेत्याने सांगितले. दरम्यान, ७ मेपासून उद्धव ठाकरे मराठवाड्यापासून दौऱ्याची सुरुवात करणार आहेत.
 
खेड्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद  
-  शिवसंपर्क मोहिमेबद्दल काही जणांचा गैरसमज झाला आहे. ही मोहीम पूर्णपणे संघटनात्मक आहे. या दौऱ्यात  शेतकऱ्यांशी वा जनतेशी संवाद साधला जाणार नाही तर गावातील, खेड्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाणार आहे. त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. थोड्या थोड्या कालावधीनंतर आम्ही संघटनात्मक बांधणीसाठीत शिवसंपर्क अभियान राबवत असतो. 
उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख  
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...