आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi Exclusive News About Nitin Gadkari

गडकरींच्या तरंगत्या हॉटेलला रेड सिग्नल, सुरक्षेचे कारणावरून राज्य गृहखात्याचा नकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नागपुरातील नितीन गडकरींचा वाडा आणि देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्याचा परिचित असलेला वाद आता मंत्रालयापर्यंत पाेहोचला आहे. महत्त्वाकांक्षी रस्ते उड्डाणपुलानंतर आता गडकरींनी पाण्यातील विविध प्रकल्पांवर नजर वळवली आहे. वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी आपले हे स्वप्न जाहीरपणे बोलून दाखवले होते आणि त्यासाठी समितीही नियुक्त केली. मात्र, या प्रकल्पांपैकी तरंगत्या हाॅटेलची वाट मुख्यमंत्र्यांनी अडवल्याचे समोर येत आहे. फडणवीसांच्या गृहखात्याने अशा हाॅटेलला सुरक्षेचे कारण दाखवून रेड सिग्नल दिला!
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या १८०० एकर जागेवर तसेच समुद्रात प्रकल्प उभारण्याचे केंद्रीय मंत्री गडकरींचे स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी मुंबईत वर्षाच्या सुरुवातीला एक पत्रकार परिषद घेऊन समुद्राच्या शेजारील जागेत तसेच समुद्रात प्रकल्प उभारण्याची महत्त्वाकांक्षा गडकरींनी बोलून दाखवली होती. यात वाॅटरवेज, हेलिपोर्ट्स, जेटी, मरीन्स तरंगत्या हाॅटेल्सचा समावेश आहे. आपले हे स्वप्न साकारण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या माजी अध्यक्ष राणी जाधव यांची समिती नियुक्त करण्यात आली असून ही समिती तीन महिन्यांत अहवाल सादर करेल, असे गडकरींनी सांगितले होते. मात्र, समितीचा अहवाल येण्यापूर्वीच गृहखात्याने तरंगते हाॅटेल उभारण्यास परवानगी नाकारल्यामुळे गडकरींना मोठा धक्का बसला आहे.

गृह विभागाचा नकार
मुंबईवरील२६/११ च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील समुद्र भागातील सुरक्षा संवेदनशील बनली असून गृह विभाग या सुरक्षेबाबत अतिशय गंभीर बनले आहे. तरंगत्या हाॅटेलमुळे समुद्र परिसरातील गर्दी वाढून सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असा अहवाल गृह विभागाने िदला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. राणी जाधव समितीचा अहवाल येण्यापूर्वीच राज्याच्या गृह विभागाने नकाराचा अहवाल पुढे केल्याने गडकरी नाराज झाले आहेत. आता या प्रकरणी दिल्लीतून तोडगा काढण्यासाठी गडकरी प्रयत्नशील असल्याचे बोलले जाते. तरंगत्या हाॅटेलची वाट आता दिल्लीवरून रोखली जाते की माेकळी करण्यात येते, यावर गडकरींची प्रतिष्ठा अवलंबून असेल.
गडकरीही इरेला पेटणार
1995 मध्ये युती सरकार सत्तेवर आल्यानंतर मुंबईतील उड्डाणपूल तसेच मुंबई-पुण्यासह राज्यातील रस्त्यांचे जाळे विणण्यासाठी गडकरींनी पुढाकार घेतला होता. इथेनाॅल इंधनावर बस चालवणे, सांडपाण्यापासून वीजनिर्मिती तसेच पुन्हा स्वच्छ पाणी तयार करणे, पूर्तीच्या माध्यमातून रोजगाराच्या हजारो संधी निर्माण करणे असे प्रयोग त्यांनी यशस्वी केले. केंद्रात रस्ते, बंदर विकासाच्या कॅबिनेटपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी देशातील रस्त्यांच्या कामांना वेग दिला असून किनारपट्टी रस्त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तरंगत्या हाॅटेल्समध्ये सुरक्षेचा अडथळा असेल तर तो दूर कसा करायचा, यासाठी गडकरीही आपली सारी शक्ती पणाला लावतील.
फडणवीसांना धोका नको
मुंबईवरसाऱ्या जगाचे लक्ष असून या संवेदनशील शहराच्या सुरक्षेबाबत फडणवीस धोका पत्करण्यास तयार नाहीत. २६/११च्या हल्ल्यानंतर अजूनही सीसीटीव्ही कॅमेरे सर्वत्र बसवले गेलेले नाहीत. तसेच मुंबई शहर, उपनगर आणि ठाण्याला लागून असलेल्या समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षा व्यवस्था अजूनही क्षमतेने उभी राहिलेली नाही. स्पीड बोट्स, जेटी प्रशिक्षित मनुष्यबळाच्या त्रुटी अजूनही दूर झालेल्या नाहीत. अशा परिस्थितीत तरंगत्या हाॅटेल्समुळे होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन पुन्हा एकदा मुंबईवर हल्ला झाला तर त्याला जबाबदार कोण, अशा मुद्द्यामुळे फडणवीस धोका पत्करण्यास तयार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.