आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi Latest News About Shivsena Bjp RPI

लोकसभेतील आत्मविश्वासाने परिपूर्ण महायुतीचे नेतेही लागले विधानसभेच्या तयारीला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोकसभा निवडणुकीचे निकाल अजून दहा दिवस लांब असले तरी एकूणच या निवडणुकीत मोदी लाटेमुळे आलेल्या आत्मविश्वासामुळे महायुतीने आता थेट विधानसभेची तयारी सुरू केली आहे. ऑक्टोबरच्या मध्यावर विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. हा चार महिन्यांचा काळ राजकीयदृष्ट्या ‘सत्कारणी’ लावण्याचे नियोजन महायुतीतल्या मित्रपक्षांनी केले आहे.
आठवडाभरापूर्वी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. त्यात गोपीनाथ मुंडे, उद्धव ठाकरे, राजू शेट्टी, रामदास आठवले आणि विनायक मेटे या प्रमुख नेत्यांची आता दर पंधरवड्याला एक बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पंधरवडा बैठकीत आगामी विधानसभेची रणनीती आखण्यात येणार आहे. यात महायुतीचे जागावाटप, संयुक्त जाहीरनामा आणि विधानसभेच्या प्रचाराचे नियोजन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मराठा आरक्षण, टोलमुक्त महाराष्ट्र आणि धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून शेफर्ड कमिशनची स्थापना यासारखे महायुतीच्या अजेंड्यावर असलेले प्रमुख मुद्दे मार्गी लावण्याचा अ‍ॅक्शन प्लॅनही या बैठकांमध्ये तयार करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली.
लोकसभेच्या जागा वाटपादरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीने खूपच घोळ घातला होता. त्यानंतरही अनेक ठिकाणी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी परस्परांविरोधात काम केल्यामुळे आघाडीच्या अनेक जागा धोक्यात आल्या आहेत. अलिकडेच खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही आघाडीतील या बिघाडाची जाहीर कबुली दिली होती. त्यामुळे आगामी समन्वय समितीच्या बैठकीत दोन्ही पक्षाकडून जाबही विचारला जावू शकतो.
याउलट परिस्थिती महायुतीच्या गोटात होती. शिवसेना-भाजपसह इतर मित्रपक्षांचे लोकसभेचे जागावाटप कोणत्याही घोळाविना पार पडलेच, पण प्रचारादरम्यानही युतीच्या नेत्यांमध्ये एखाद अपवाद वगळता फारसे रुसवे फुगवे दिसले नाहीत. त्यामुळे तोच समन्वय टिकवून ठेवत विधानसभेसाठी जोमाने कामाला लागण्याचे महायुतीचे नियोजन आहे.
मराठा आरक्षणासाठी मुंबईत भव्य मोर्चा काढण्याचा निर्धार
मराठा आरक्षणासाठी सत्ताधारी आणि त्यातही विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असताना महायुतीने या मुद्द्याचे श्रेय सत्ताधार्‍यांनी मिळू न देण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महायुतीतर्फे मुंबईत एक विशाल मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा मोर्चा लोकसभेच्या निकालानंतर लगेचच काढण्यात येणार आहे.