आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदोळ्यावरील जगाचे सम्यक दर्शन!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- व्यक्त व्हावे, अभिव्यक्त व्हावे… वाद व्हावेत, विवाद झडावेत... व्यक्तीने समष्टीला विचारांचे दान देत राहावे...

जन्माला येणाऱ्या प्रत्येक क्षणात जग सामावले असते. म्हणजे, एकाच क्षणात युद्धही सुरू असते आणि शांततेचे नोबेल कोणाला मिळालेले असते. धर्म, जात, पात, वंश या साऱ्यांचा प्रछन्न वापर सुरू असतो. दुसऱ्या बाजूला कल्याणकारी कामेही सुरू असतात. जग असे कायम आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर हेलकावत असते. मात्र, दीपावलीच्या दिवसांत सगळीकडे झळाळणारा प्रकाश प्रेरणादायी असतो. निराशेचा अंधार संपवून आशेचा प्रकाश वातावरण सुखकर करणारा, याची जाणीव सातत्याने त्यामुळे होत असते. याच साऱ्या पैलूंचे नेटके दर्शन घडलंय, दै. “दिव्य मराठी’- २०१६ च्या दिवाळी अंकातील रसदायी लेखांमध्ये.

यंदाच्या अंकात साहित्य, संस्कृती, राजकारणासह जीवनाच्या प्रत्येक अंगाला भिडणाऱ्या पैलूंचे विश्लेषण करणाऱ्या लेखांचा समावेश आहे. धर्म आणि लोकशाहीतल्या संघर्षावर कठोर चिंतन करणारे स्वामी विवेकानंद, उजव्या आणि डाव्या विचारसरणीच्या मानसिकतेची वस्तुनिष्ठ चिकित्सा करणारे जोनाथन हाइट, मराठी साहित्यसृष्टीत बंडखोरी करणारे अशोक शहाणे यांच्यापासून ते ऑलिम्पिक पदक घेऊन येणारी साक्षी मलिक हिच्यापर्यंत ज्यांनी आपली क्षेत्रे गाजविली त्या साऱ्यांचे कर्तृत्व या अंकात प्रकटले आहे.

महाराष्ट्राला श्रमाचं विद्यापीठ देणारे बाबा आमटे, साचेबद्ध चित्रपट संगीताला अनवट वळणावर घेऊन जाणारे अजय-अतुल, व्यवस्थेच्या विरोधात एल्गार पुकारत समष्टीला ऊर्जा पुरवणारे नागराज मंजुळे यांनी आपले आयुष्य आशयप्रधान, सुरेल केलेले आहे. वैचारिक लेखनाबरोबरच अरविंद जगताप, सुदाम राठोड, सत्यपालसिंग आधारसिंग राजपूत, बालाजी सुतार यांच्या कविता आहेत. या अंकाचे मुखपृष्ठ सजलेय ते नवतरुण छायाचित्रकार प्रियांका सातपुते यांनी टिपलेल्या संस्कृती-परंपरेचा नादमयी चेहरा दर्शविणाऱ्या व मन प्रसन्न करणाऱ्या छायाचित्राने. मुंबईचे डेप्युटी एडिटर प्रशांत पवार व शेखर देशमुख यांनी अंकाचे संपादन केले अाहे.

मान्यवर लेखक
‘शब्द व्हावे श्वास, शब्द व्हावे वारा आणि शब्दांचाच निवारा, शब्द व्हावे जमीन, शब्द व्हावे आकाश आणि शब्दांचाच अवकाश...’ या काव्यपंक्तींची प्रचिती देणाऱ्या दै. दिव्य मराठीच्या दिवाळी अंकामध्ये दत्तप्रसाद दाभोलकर, प्रशांत दीक्षित, विश्राम गुप्ते, शेखर देशमुख, प्रशांत पवार, वीरा राठोड, संजय आर्वीकर, इंद्रजीत खांबे, डॉ. अशोक मोडक, संकल्प गुर्जर, सुनील खांडबहाले आणि शशिकांत सावंत, रसिका आगाशे आणि दीपांकर, डॉ, मीना शेटे-संभू आणि अमोल उदगीरकर, चंद्रशेखर टिळक आणि ज्युनियर ब्रम्हे आदी मान्यवर लेखक मंडळींनी आपल्या लेखनाविष्काराने दिवाळी अंकाचे वेगळेपण ठसठशीतपणे दाखवून दिले आहे.
बातम्या आणखी आहेत...