आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा बँकांच्या जुन्या नोटा सरकारने बदलून द्याव्यात; दिवाकर रावतेंची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नोटाबंदीनंतर जिल्हा बँकांकडे आलेल्या जुन्या नोटा बदलून देण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिल्याने जिल्हा बँका अडचणीत आल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी जिल्हा बँकांकडे पैसे नसल्याने या बँकांकडे जमा झालेल्या २७७१ कोटी रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने बदलून देण्याबाबत सरकारने हालचाल करावी, अशी मागणी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी केली. तसेच हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  
 
रावते म्हणाले, केंद्र सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर जिल्हा बँकांमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर जुन्या नोटा जमा केल्या. मात्र, जिल्हा बँकांमधील रकमेत घोळ असल्याचे सांगत रिझर्व्ह बँकेने नोटा बदलून देण्यास नकार दिल्याने जिल्हा बँकांचे अर्थकारण बिघडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांशी बोलून या बँकांना दिलासा द्यावा. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी याबाबत चर्चा झाल्याचेही रावते यांनी या वेळी बोलताना सांगितले.

चौदा बँका डबघाईला  
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ग्रामीण कृषी अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. मात्र, नोटाबंदीमुळे त्या आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. या बँकांना खातेधारकांच्या जमा रकमेवर व्याज द्यावे लागत आहे. त्यामुळे कर्ज देण्यास बँकांना अडचण येत आहे. तसेच काही ठेवीदार ठेवी परत घेत असल्याने बँकांपुढील अडचणींत वाढ होत आहे. महाराष्ट्रातील ३२ जिल्हा बँकांपैकी १४ जिल्हा बँका आधीच आर्थिकदृष्ट्या डबघाईला आल्या असून उर्वरित बँकांचे आर्थिक संकट दूर न केल्यास कृषी पतपुरवठ्याची व्यवस्था कोलमडून पडेल आणि शेतकऱ्यांना पुन्हा सावकारी पाशात अडकावे लागेल, असेही दिवाकर रावते म्हणाले.  
 
बातम्या आणखी आहेत...