आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Do Investigate Against Modi, Ishrat Family Demand

मोदींचीदेखील चौकशी व्हावी, इशरतच्या कुटुंबीयांची पत्रकार परिषदेत मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ज्यांनी इशरतला मारले, त्यांचे नाव केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या आरोपपत्रात आले आहे. आता ज्यांनी तिला मारण्याचा कट रचला, त्या लोकांची नावेदेखील चार्जशीटमध्ये यावीत, अशी अपेक्षा इशरत जहाँची आई शमिमा कौसर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. तसेच, या कटात नरेंद्र मोदीदेखील सामील होते का, याची चौकशी करण्याची मागणी तिची बहीण नुसरत व राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली.


माझी मुलगी निरपराध असल्याचे नऊ वर्षांपासून मी सांगत आहे. ज्यांनी माझ्या मुलीला मारले, त्यांच्यामुळे आमच्या सर्व कुटुंबाला हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. इशरत गेल्यानंतर आमच्या कुटुंबातील आनंददेखील निघून गेला. आता ज्यांनी तिला मारण्याचा कट रचला, त्यांचीदेखील नावे आरोपपत्रात यावीत, जेणेकरून आमच्या हृदयाला शांती लाभेल, अशी प्रतिक्रिया शमिमा यांनी व्यक्त केली.


ही लढाई हिंदू अथवा मुसलमान यांची नसून सर्वसामान्य गरिबांची आहे. आमच्या घरावरील दहशतवादाचा डाग आता पुसला गेला आहे. इशरतच्या मृत्यूनंतर आमचे प्रत्येक स्वप्न भंगले. बहिणीच्या लग्नाचा, भावाच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला. या प्रकरणात जे पोलिस अधिकारी सहभागी होते, त्यांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी नुसरतने केली.


मोदी अनभिज्ञ कसे : आव्हाड
इंटेलिजन्स ब्युरोचा अहवाल चोवीस तासांच्या आत थेट मुख्यमंत्र्यांकडे जातो. देशातील सर्वच राज्यांत ही पद्धत अवलंबली जाते. त्यामुळे इशरत जहाँ प्रकरण नरेंद्र मोदींना माहिती नव्हते, यावर आपण कसा विश्वास ठेवणार? त्यामुळे या कटात तेव्हाचे मुख्यमंत्रीदेखील सामील होते का, याची नि:पक्षपाती चौकशी व्हावी, अशी अपेक्षा आव्हाड यांनी व्यक्त केली.