आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींना ऐकून घेण्याची सवय नाही, प्रश्न विचारल्यास संतापतात; भाजप खासदारानेच डागली तोफ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून नाना पटोले ओळखले जातात. - Divya Marathi
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून नाना पटोले ओळखले जातात.
नागपूर- गोंदिया-भंडारा येथील भाजपचे खासदार नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली आहे. मोदींना ऐकून घेण्याची सवय नाही, प्रश्न विचारल्यास संतापतात, असे म्हणत त्यांनी थेट पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडले. केंद्र आणि राज्य सरकारबाबत बोलताना त्यांनी दिल्लीत महाराष्ट्राला भिकाऱ्यासाठी वागणूक मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
आपल्या या वक्तव्यावर वाद वाढल्यावर त्यांनी मी शेतकऱ्याच्या बिगर राजकीय कार्यक्रमात बोलत होतो असे सांगत सारवासारव केली. मी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांबाबत काहीही बोललो नाही. मला बदनाम करण्यासाठीच असे हे केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
खासदारांना देत नाहीत किंमत
पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या विश्रामगृहात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी नाना पटोले यांनी ही टीका केली. दिल्लीतील लोकांचे मन फारच छोटे असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्राला कमी निधी मिळत असून निधी आणण्याची क्षमता राज्याच्या नेतृत्वात नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रातील खासदारांना दिल्लीत काहीच किंमत नसल्याचे त्यांनी सांगितले. नाना, तुमच्याकडे मंत्रिपद यायला हवे होते असे अनेक लोक आजही म्हणतात, मात्र मोदींच्या कारभारात मंत्री घाबरलेले असतात, मंत्र्यांची काय स्थिती आहे हे आपण पाहतो आहोत, त्यामुळेच मला मंत्रिपद नको, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.
 
मुख्यमंत्र्यांवरही डागली होती तोफ
आपल्या भाषणात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, तसेच राज्यातही नैसर्गिक साधन-संपत्ती मुबलक आहे. असे असूनही इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला सगळ्यात कमी निधी केंद्राकडून दिला जातो. केंद्राकडून जास्त निधी आणण्याची धमक मुख्यमंत्र्यांमध्ये नाही. संसदेचे अधिवेशन होण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि राज्यातील खासदारांची बैठक होत असते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारे बैठक घेण्याची पद्धतच संपवून टाकली आहे, असाही आरोप पटोले यांनी केला.
 
मुंबईत गेल्यावर मानसिकता बदलते
मुख्यमंत्री विदर्भातला असो, मराठवाड्यातला असो की पश्चिम महाराष्ट्रातला मुंबईत गेला की त्याची मानसिकता बदलते, असाही टोला नाना पटोले यांनी लगावला. काही दिवसांपूर्वीच नाना पटोले यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. पुन्हा एकदा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक शरसंधान साधले.
 
पक्षात हिटलिस्टवर
केंद्रात ओबीसी मंत्रालय स्थापन झाले पाहिजे, वृक्ष संवर्धनांसाठी हरित कर आकारण्यात यावा, शेतकरी आत्महत्या थांबण्यासाठी सरकारने शेती क्षेत्रातील भागीदारी वाढवावी, असेही मुद्दे आपण नरेंद्र मोदींना न जुमानता मांडले आहेत, असा दावाही पटोले यांनी यावेळी केला. आपण पक्षात हिटलिस्टवर असल्याचेही त्यांनी सांगितले. आपण वास्तव मांडत असल्याने पंतप्रधान आपल्यावर भडकल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्याला याने काहीही फरक पडत नसून आपण कोणालाही घाबरत नसल्याचे त्यांनी नमूद केले. 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
 
बातम्या आणखी आहेत...