आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळजी नको, तुमचे घोरणे थेट रोबोटच बंद करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रात्री झोपेत घोरणे म्हणजे स्वत:ची झोप खराब करण्याबरोबरच शेजारी झोपणार्‍या व्यक्तीलाही जबरदस्तीने जागे राहण्याची शिक्षा असते. पण आता त्याची काळजी नको, तुमचे घोरणे थेट रोबोटच बंद करणार आहे. हो. झोपेतली ही घरघर थांबवणारी एक अत्याधुनिक शस्त्रक्रिया आता उपलब्ध झाली आहे. रोबोटच्या मदतीने केलेल्या या शस्त्रक्रियेचा मुंबईसह जगभरातील दोन हजारांपेक्षा जास्त डॉक्टरांनी मंगळवारी ‘लाइव्ह’ अनुभव घेतला.

घोरणे ही झोपेत उद्भवणारी समस्या असून यामुळे झोपलेली व्यक्ती शेकडो वेळा श्वासोच्छ्वास बंद करते. श्वसनप्रक्रियेतील या अंतरास एप्निया म्हणतात. झोपेत असताना ऊध्र्व श्वसनमार्गातील पेशींचे कार्य बंद पडून श्वसन बंद होते. याला इंग्रजीमध्ये ‘ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एप्निया’ म्हणतात. या विकारावर रोबोटिक शस्त्रक्रिया उपलब्ध झाली असून एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. विकास अगरवाल यांनी तीन रुग्णांवर ‘ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एप्निया’ च्या उपचारांसाठी जिभेच्या खालच्या बाजूस शस्त्रक्रिया केली. रोबोटिक तंत्र आणि एंडोस्कोपीच्या साहाय्याने कान-नाक-घशाशी संबंधित किचकट अशी ही देशातील पहिलीच शस्त्रक्रिया होती. स्थूल व्यक्तींमध्ये ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एप्नियाच्या लक्षणांचे प्रमाण चौपट अधिक असे. पण आता सर्वसामान्य व्यक्तींमध्येही ओएसएची लक्षणे अधिक प्रमाणात दिसत असल्याचे डॉ.अगरवाल यांनी सांगितले. एआयआयएमएसच्या 2009 च्या अहवालानुसार भारतीयांमध्ये या आजाराचे प्रमाण 13 टक्के आहे आणि त्यापैकी केवळ 4 टक्के रुग्णच डॉक्टरांकडे जातात.


पारंपरिक व रोबोटिक शस्त्रक्रियेतील फरक
0पारंपरिक शस्त्रक्रियेचा खर्च : एक ते दीड लाख रु.
0 रोबोटिक शस्त्रक्रियेचा खर्च : 3 लाख रु.
0 रोबोटिक शस्त्रक्रियेचे फायदे
0 शस्त्रक्रियेमध्ये केवळ एक ते दोन सेंटिमीटरचे छिद्र पाडले जाते. त्यामुळे रक्तस्राव होण्याचे प्रमाण नगण्य
0 रुग्णालयात राहण्याचा कालावधी एक ते तीन दिवस (पारंपरिक पद्धतीत सात ते दहा दिवस)
0 शस्त्रक्रियेनंतर पाच ते सात दिवसांत दिनक्रम सुरळीत, संसर्ग होण्याचे प्रमाण कमी


कशी आहे शस्त्रक्रिया
जिभेखालचे स्नायू जड असतात. पारंपरिक शस्त्रक्रियेत जबडे पुढे घेऊन शस्त्रक्रिया केली जाते. परंतु रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये कोणतीही जखम होत नाही. रोबोटच्या मदतीने थेट तोंडात आत जाऊन जिभेच्या मागील बाजूस असलेली ही जागा कापली जाते.