आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Don't Worry, But Reduce Going To Jail CM Fadnvis Critised

काळजी नको, जेलमध्ये जाणे आता कमी करा; मित्र पक्षांना मुख्यमंत्री फडणवीस यांचा टोला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसंग्रामच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात विनायक मेटे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोत तसेच राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांनी सत्तेचा वाटा मागितला. आम्ही तुमच्याबरोबर होतो आणि आताही आहोत, आता दिलेला शब्द पाळण्याचे कर्तव्य पार पाडा, असे आवाहन महायुतीमधील मित्रपक्षांनी केले. यावर फार
काळजी करू नका, योग्य वेळी निर्णय होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. हे आश्वासन देतानाच आता आंदोलने करून जेलमध्ये जाणे कमी करा... असा टोलाही मारण्यास ते विसरले नाहीत.

शिवसंग्रामच्या वतीने शनिवारी एलफिन्स्टन येथील कामगार मैदानात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी मुख्यमंत्र्यांसमोर मित्रपक्षांनी सत्तेचा सूर आळवला. सदाभाऊ खोत म्हणाले, आम्ही आंदोलने केली तरी त्या शेतक-यांच्या भावना आहेत. त्या आम्ही मांडल्या. शेवटी मूल रडल्याशिवाय आईही दूध पाजत नाही. राज्यातील शेतक-यांची अवस्था
कुपोषित बालकासारखी झाली आहे. आम्हाला सत्तेची आस नाही, मात्र कास्तकारांकडे लक्ष दिले गेले पाहिजे.
भाजपने सत्तेत वाटा दिला नाही म्हणून आम्ही नाराज आहोत, असे समजू नका. पाच वर्षे आम्ही तुमच्या बरोबरच आहोत. महादेव जानकरांनी मात्र आडपडदा न ठेवता सत्तेचा वाटा द्याच, असे मुख्यमंत्र्यांना सांगितले. सत्तेत घेऊन फडणवीस न्याय देण्याची भूमिका पार पाडतील, असा मला विश्वास वाटतो. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर विश्वास
ठेवून आम्ही महायुतीत आलो होतो. मात्र आता ते नाहीत. अशा वेळी फडणवीस तसेच पंकजा मुंडेंकडून आमच्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्याची जबाबदारी आता तुमची आहे.

मेटेंनी आम्ही ज्यांच्यासोबत जातो, त्यांचे राज्य येते, असा अनुभव आहे. मात्र महायुतीसोबत येऊनही आम्ही अजूनही सत्तेबाहेर आहोत. आता दिलेला शब्द पाळण्याची वेळ आली आहे. मित्रपक्षांच्या सत्तेतील वाट्याच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचे उत्तर होते, महायुतीचे घटक पक्ष असल्याने आपण एकमेकांच्या अडचणी समजून घेऊन आपण पुढे जायला हवे. मात्र फार काळजी करण्याची गरज नाही. मित्रपक्षांना सत्तेत निश्चितपणे सामावून घेतले जाईल. सत्तेवरून
महायुती फुटेल असे अजिबात होणार नाही.

शिवाजी महाराजांच्या मॉडेलने सरकार चालणार!
'छत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ!' असे जनतेला आवाहन करत महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून जनतेच्या कल्याणासाठी जसे राज्य चालवले होते तसेच सरकार महायुतीकडून चालवले जाणार आहे. जनतेच्या हितासाठी हे सरकार असेल, याबद्दल सर्वांनी विश्वास बाळगावा. त्यांच्या
विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही, असे फडणवीस म्हणाले.