आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Narendra Dabholkar's Murderer Sanatani... Sanatani

डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे खुनी ‘सनातनी.. सनातनी’!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जादूटोणा कायदा झालाच पाहिजे, विवेकाचा आवाज बुलंद करा, डॉक्टरांच्या मारेक-यांना अटक झालीच पाहिजे, डॉक्टर दाभोलकरांचे खुनी सनातनी.. सनातनी! असे नारे सोमवारी अवघ्या मुंबईभर घुमले. जादूटोणाविरोधी कायद्याला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी राणीबाग ते आझाद मैदान अशी दिंडी काढण्यात आली. त्यामध्ये विविध पक्ष आणि संघटनांचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
राजकीय पक्षच लोक जमा करू शकतात. याला आजच्या दिंडीने खणखणीत उत्तर मिळाल्याचे सांगत विवेकाचा आवाज बुलंद करण्यासाठी दिंडीत सहभागी झालेल्यांचे मुक्ता दाभोलकर यांनी आभार मानले. पोलिस विभागातच अंधश्रद्धा पसरली आहे. त्यामुळे दाभोलकरांच्या खुनामागील सूत्रधार सापडण्याची शक्यता नाही. दाभोलकरांचा खून पचला तर सनातनी मंडळींच्या कारवाया आणखी वाढतील, अशी भीती काँग्रेस खासदार हुसेन दलवाई यांनी व्यक्त केली. तुकाराम आणि ज्ञानेश्वरांनी आपल्या अभंगांमधून अंधश्रद्धेवर कायम प्रहार केले. ती परंपरा पाळणारे वारकरी अंधश्रद्धाविरोधी कायद्याला कशासाठी विरोध करतील, असा प्र्रश्न उपस्थित करत वारक-यांमध्ये सनातनी गटाने शिरकाव केल्याचा आरोप वाबळे महाराज यांनी केला. सुसंस्कृत समजल्या जाणा-या आपल्या राज्याच्या हातून अत्यंत निंदनीय कृत्य घडले आहे. त्याचे प्रायश्चित्त आपण जादूटोणाविरोधी कायदा संमत करून घ्यायला हवे, अशी भूमिका अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने मांडली.
दाभोलकर यांचे मारेकरी 100 दिवसांत सापडू शकले नाहीत. याचाच अर्थ खुनाचा तपास गंभीरतापूर्वक झालेला नाही. आपण आता सीबीआय तपासाची मागणी करायला हवी, असे मत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव प्रकाश करात यांनी मांडले. सनातनी शक्तींनी देशात भीतीचे वातावरण तयार केले आहे. ते आपण दूर केले पाहिजे. अन्यथा उद्या ते लोकशाहीची प्रतीके संपवण्याचाही प्रयत्न करतील, असा मुद्दा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्र्रकाश आंबेडकर यांनी मांडला. या वेळी अंनिस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
आघाडी शासनाला कायदा पारित करण्याची इच्छाशक्ती नव्हती. त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षांच्या असहमतीचा बागुलबुवा उभा केल्याचा आरोप शेकापचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांनी केला. तसेच 10 डिसेंबरपूर्वी कायदा मंजूर न केल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा दिला.
या वेळी आमदार कपिल पाटील, पुष्पा भावे, मेधा पाटकर यांची भाषणे झाली. दिंडीमध्ये ग्रामीण, शहरी तसेच वारकरी,आदिवासी आणि महाविद्यालयीन युवक-युवतींची मोठी उपस्थिती होती. रचना संसदच्या विद्यार्थ्यांनी भानामतीची बाहुली आणि लिंबू मिरचीच्या बनवलेल्या प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. गेली 13 वर्षे जादूटोणा विरोधी विधेयक प्रलंबित होते. दाभोलकर यांचा पुण्यात 20 ऑगस्ट रोजी खून झाला. त्याच्या दुस-या दिवशी शासनाने या कायद्याचा अध्यादेश काढला. 9 डिसेंबरपासून नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामध्ये हा कायदा मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. ते विनाविलंब मंजूर करावे, यासाठी आजच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
मुक्ता व हमीद दाभोलकर यांचा सहभाग
खासदार हुसेन दलवाई, कामगार नेते दत्ता इस्वलकर, जनआंदोलनाच्या मेधा पाटकर, ‘माकप’चे प्रकाश करात, आमदार कपिल पाटील, ‘भारिप’चे प्रकाश आंबेडकर, ‘भाकप’चे भालचंद्र कांगो, ‘शेकाप’चे एन. डी. पाटील, दाभोलकरांची कन्या मुक्ता आणि चिरंजीव हमीद दाभोलकर, कर्मचारी महासंघाचे र. ग. कर्णिक, ज्येष्ठ विचारवंत पुष्पा भावे, राष्‍ट्रसेवादलाचे सुभाष वारे, आमदार विद्या चव्हाण, वारकरी सेवा समितीचे ज्ञानेश्वर वाबळे, ‘अंनिस’चे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष, संदीप कुलकर्णी, नंदू माधव, शाहीर संभाजी भगत सहभागी होते.