आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामानव बाबासाहेबांना महापरिनिर्वाणदिनी अभिवादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 57 व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त मुंबईसह राज्यभर त्यांना अभिवादन करण्यात आले. मुंबईतील दादरमधील चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या अनुयायांनी आज लाखोच्या संख्येने हजेरी लावून त्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी चैत्यभूमीवर पोहचून पुष्पहार अर्पण केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांच्या अनुयायांना आजचा दिवस शांततेने घालविण्याचे आव्हान केले. इंदू मिलच्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित भव्य स्मारकाचे प्रतिकात्मक भूमिपूजन रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाने गुरुवारी रात्री केले होते. त्याचा धागा पकडून चव्हाण म्हणाले, आजचा दिवस राजकारण करण्याचा नसून बाबासाहेबांच्या महान कार्याचा गौरव करण्याचा दिवस आहे.
आठवले गटाच्या रिपाइंने सचिन मोहिते, रमेश गायकवाड यांच्यासह सुमारे शंभर कार्यकर्त्यांनी काल रात्री साडेदहाच्या सुमारास मिलच्या परिसरात प्रवेश केला होता. याचबरोबर कार्यकर्ते मिलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ होते तर काही समुद्राकडील भिंतीवर चढून मिलमध्ये घुसले. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी मेणबत्ती लावून येथे प्रतिकात्मक भूमिपूजन केले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी तेथे बाबासाहेबांचा फोटोही लावला.
गेल्यावर्षी 5 डिसेंबरला केंद्र सरकारने इंदू मिलचा भूखंड बाबासाहेबांच्या स्मारकासाठी देण्याचे जाहीर केले होते. मात्र वर्षभरात त्याबाबतची प्रत्यक्ष कार्यवाही झाली नव्हती. त्यामुळे आठवले गटाने 5 डिसेंबरपूर्वी या स्मारकाच्या भूमिपूजनाची मागणी केली होती. भूमिपूजन न झाल्यास इंदू मिलचा ताबा घेणार असल्याचा इशारा या गटाने दिला होता. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. तरीही पोलिसांना गुंगारा देत आंदोलकांनी अखेर गुरुवारी रात्री मिलमध्ये प्रवेश करून भूमिपूजन पार पाडले होते.