आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाभोलकर हत्या: 25 लाखांची ऑफर मारियांनी दिली नव्हती, कोर्टात मनीष नागोरीचे घुमजाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- गुन्हा कबूल करण्यासाठी मला कोणीही 25 लाख रूपयांची ऑफर दिली नाही. पुणे पोलिस दाभोलकर हत्याकांडात मला गोवत असल्याने रागातून मी हा आरोप केला होता, असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी शस्त्रे पुरविल्याचा आरोप असलेल्या मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांनी आज (मंगळवार) पुणे कोर्टात सांगितले.
मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांना आज (मंगळवार) पुण्यातील कोर्टासमोर हजर करण्यात आले. त्यांच्या पोलिस कोठडीत 4 फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
दाभोलकर यांच्या हत्येचा गुन्हा कबूल करण्यासाठी दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख राकेश मारिया यांनी 25 लाखांचे आमिष दाखवल्याचा खळबळजनक आरोप मनीष नागोरीने गेल्या आठवड्यात कोर्टासमोर केला होता. या प्रकरणी मनीष रामविलास नागोरी (24) आणि विकास रामअवतार खंडेलवाल (22) यांनी गेल्या मंगळवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर मनीषने कोर्टासमोर हा गंभीर आरोप केला होता.
गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या सांगण्यानुसार आम्हाला खोटे आरोपी करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्यानंतर लाचलुचपतविरोधी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. बी. शेख यांनी या दोघांना 28 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्याची मुदत आज संपली. त्यामुळे आज पुन्हा त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी मनीषने आपल्याला गुन्हा कबूल करण्यासाठी कोणीही 25 लाख रूपयांची ऑफर दिली नव्हती असे घुमजाव केले. दरम्यान, पोलिसांच्या मागणीनुसार अधिक चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून या दोघांना 4 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
नागोरीने आज कोर्टात पुन्हा सांगितले की, एटीएसने ताब्यात घेऊन 45 दिवस आमची चौकशी केली. त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. बळजबरीने आमची नार्को व लाय डिटेक्टर चाचणीही घेण्यात आली. थर्ड डिग्री वापरून आमचा छळही झाला. चार महिन्यांपूर्वी पोलिसांना बॅलेस्टिक अहवाल मिळाला. आमचा या हत्याकांडाशी काहीही संबंध नाही. तरीही पोलिस आम्हाला यात गोवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे रागाने चिडून हे आरोप केले होते.
एटीएस व पोलिसांवर नागोरी याने केलेले आरोप खोटे आहेत. बचावासाठी आरोपी असे आरोप करतच असतो. आम्ही आमच्या दृष्टीने तपास करत आहोत. खंडेलवालकडे सापडलेले पिस्तूल आणि दाभोलकर हत्याकांडातील हल्लेखोरांनी ज्यातून गोळय़ा झाडल्या ते पिस्तूल एकच असून, नागोरीनेच ते त्याला दिले असल्याचे पुण्याच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त शहाजी सोळुंके यांनी याआधीच स्पष्ट केले होते.