आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Heena Gavit News In Marathi, Nandurbar, Nationalist Congress, BJP

नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीला झटका,पवारांच्या धमकीला झुगारून डॉ. हिना गावित भाजपमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आपल्या मुलीला भाजपकडून उमेदवारी मिळवून दिल्यास त्याच क्षणी त्यांचे मंत्रिपद काढून घेऊ,’ या अजित पवारांच्या धमकीला जराही भीक न घालता डॉ. हिना गावित यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करून नंदुरबार लोकसभेची उमेदवारीही मिळवली. त्यामुळे आता विजयकुमार गावित यांची राष्‍ट्रवादीतून हकालपट्टी होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.


डॉ. हिना गावित यांच्या भाजप प्रवेशात गोपीनाथ मुंडे यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीत आणून गोपीनाथ मुंडे यांना आव्हान देणा-या राष्ट्रवादीवर पलटवार करण्याची आणखी एक संधी घेत मुंडेंनी उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीला जबर हादरा दिल्याचे मानले जाते. हिना यांच्या दिल्लीत झालेल्या प्रवेशावेळी मुंडे यांच्यासह पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह, पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, विनोद तावडे, राजीव प्रताप रूडी, सुषमा स्वराज आदी उपस्थित होत्या.


हिना गावित म्हणाल्या, हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मला आवडत असल्याने मी हा निर्णय घेतला. वडील राष्‍ट्रवादीत असले तरी त्यांनी मला व्यक्तिस्वातंत्र्य दिले आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकीतही गावित यांनी आपले बंधू शरद गावित यांना काँग्रेसचे माणिकराव गावित यांच्याविरुद्ध समाजवादी पक्षाच्या तिकिटावर उभे केले होते. तेव्हा अवघ्या 40 हजारांच्या मताधिक्याने माणिकरावांचा विजय झाला होता.


पवारांच्या इशा-याला टोपली
हिना या भाजपमध्ये प्रवेश करणार याची कुणकुण लागलेल्या राष्‍ट्रवादीने डॉ. विजयकुमार यांचे मंत्रिपद काढण्याचा तसेच पक्षातून हकालपट्टी करण्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता. मात्र डॉ. विजयकुमार यांनी पवारांच्या इशा-याला केराची टोपली दाखवताना त्यांनी हिनाला भाजप प्रवेशासाठी हिरवा कंदील दाखवला. पवारांचे इशा-याचे काय परिणाम होऊ शकतात, याचा अंदाज घेऊनच आपल्या मुलीच्या कारकीर्दीसाठी विजयकुमारांनी हे धाडसी पाऊल उचलले आहे. त्यामुळे विजयकुमार हे बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला गेले नाहीत. या विषयावर राष्‍ट्रवादी काँगे्रसचे राष्‍ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना विजयकुमारांवर कारवाईची शक्यता वर्तवली आहे.


लोकांना बदल हवाय : हिना
‘नंदुरबारमध्ये एकच व्यक्ती तब्बल नऊ वेळा खासदार झाली. मात्र आमचा भाग अजूनही विकासापासून वंचितच राहिला. आता मात्र या जिल्ह्यातील लोकांना बदल हवा आहे. माझे बाबा विजयकुमार यांच्याप्रमाणे मी नंदुरबारच्या विकासाचे स्वप्न पाहिले आहे. भाजपमध्ये जाऊन ते स्वप्न पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील. लोक या बदलाला नक्कीच प्रतिसाद देतील’, अशा शब्दात हिना यांनी भावना व्यक्त केल्या.


विजयकुमार स्वत:च राजीनामा देतील!
राष्‍ट्रवादी कॉँग्रेसने मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची वाट बघण्यापेक्षा डॉ. विजयकुमार गावित हे स्वत:हून मंत्रिपदाचा राजीनामा देतील, असे राष्‍ट्रवादीच्या सूत्रांनी सांगितले. मात्र ते आमदारकीचा राजीनामा देणार नाहीत. कॅबिनेटमंत्रिपद गेले तरी विजयकुमार यांना फारसा काही फरक पडणार नाही. विजयकुमार यांची नंदुरबार जिल्ह्यावर मोठी पकड आहे. पक्ष उमेदवारी देत नाही, हे पाहून त्यांनी आपले भाऊ शरद गावित यांना समाजवादी पक्षाची उमेदवारी देऊन आमदारकीला निवडून आणले होते. कदाचित राष्‍ट्रवादीने त्यांना पक्षातून काढल्यास लोकसभाच नव्हे तर विधानसभेतही पक्षाला ते खूप मोठा दणका देऊ शकतात.