आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेहिशेबी मालमत्ता प्रकरण : गावित यांच्या चौकशीला गृहखात्याचा हिरवा कंदील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांची उघड चौकशी करण्याची धुळे लाचलुचपत विरोधी पथकाने केलेली मागणी गृहखात्याने मंजूर केली आहे. तशी माहिती सोमवारी राज्य शासनाच्या वतीने उच्च न्यायालयात देण्यात आली. आता ही फाइल अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आली आहे.
धुळे ‘एसीबी’च्या चौकशीत गावित दोषी आढळले असतानाही राज्य सरकार कारवाई का करत नाही, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली होती. तसेच याबाबत सहा आठवड्यांत म्हणणे मांडण्याचे आदेशही सरकारला दिले होते. दरम्यान, गावित यांच्याविरोधात चौकशीचे आदेश देऊन राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत केलेल्या बंडखोरीचा वचपा काढला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
नऊ हजार पगार असताना संपत्ती एवढी वाढलीच कशी?
मुसळे यांनी माहितीच्या अधिकारातून मिळवलेल्या माहितीनुसार विजयकुमार गावित यांची मालमत्ता एक कोटी 30 लाख इतकी असून त्यांच्या पत्नी आणि मुलीच्या नावे दीड कोटींची मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले होते. तर 2009 मध्ये निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात गावित यांनी स्वत:ची मालमत्ता 2 कोटी 23 लाख तर कुटुंबाची मालमत्ता 4 कोटी 78 लाख असल्याचे नमूद केले होते. गावित यांचे वडील नंदूरबारमध्ये शिक्षक होते. गावित हे स्वत: 1994 पर्यंत एका वैद्यकीय महाविद्यालयात लेक्चरर होते. त्या वेळी त्यांचा पगार होता 9 हजार 715 रुपये. विजयकुमार गावित यांचे बंधू आमदार शरद गावित हेसुद्धा महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळात 1994 पर्यंत चतुर्थ र्शेणी कर्मचारी म्हणून काम करत होते. त्या वेळी त्यांचा शेवटचा पगार होता बाराशे नव्वद रुपये. असे असतानाही गावित यांच्या मालमत्तेत अचानक झालेली वाढ ही कोणत्या स्रोतातून झाली याबाबतची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने संबंधित यंत्रणांना द्यावेत, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे.

गावित यांच्या समर्थकांकडेही संपत्ती वाढल्याची तक्रार
2009 ते 2012 या कालावधीत गावित यांच्याविरोधात लाचलुचपत विभागाकडे आलेल्या असंख्य तक्रारींच्या अनुषंगाने लाचलुचपत विभागाने चौकशी केली असता गावित यांच्याकडे उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याचे लाचलुचपत विभागाच्या निदर्शनास आले होते. तसेच गावित यांच्या समर्थकांच्या संपत्तीतही बेहिशेबी वाढ झाल्याचे पुरावे लाचलुचपत विभागाला प्राप्त झाले आहेत. त्याआधारेच गावित यांच्याविरोधात चौकशी करण्यासाठी तसेच कारवाईसाठी नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते विष्णू मुसळे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसच्या उमेदवाराविरोधात गावित यांच्या कन्या हिना गावित यांनी भाजपतर्फे निवडणूक लढवल्यामुळे राष्ट्रवादीने विजयकुमार गावित यांना मंत्रिमंडळातून हटवले होते.