आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य असलेले लंडनमधील घर राज्य सरकार खरेदी करणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- लंडनमधील किंग हेन्री रस्त्यावरील याच वास्तूमध्ये बाबासाहेबांचे वास्तव्य होते)
मुंबई- भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लंडन शहरामध्ये शिक्षण घेत असताना ज्या घरात राहत होते ती ऐतिहासिक वास्तू विकत घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. लंडनमधील किंग हेन्री रस्त्यावरील सुमारे 2 हजार चौरस फुटांच्या या वास्तूची किंमत 40 कोटी रूपये इतकी आहे. 1920 च्या दशकात बाबासाहेबांनी लंडन शहरातील 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये शिक्षण घेतले होते.
डॉ. बाबासाहेब हे ज्या घरात राहिले ते घर 40 कोटी रूपयांत लिलावात काढण्यात आल्याची माहिती लंडनमधील 'द फेडरेशन ऑफ आंबेडकरीज अॅन्ड बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन' (फाबो) संघटनेने राज्य आणि केंद्र सरकारला दिली होती. त्यानंतर ही ऐतिहासिक वास्तू राज्य सरकारने विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली. याबाबत राज्य सरकारने केंद्र सरकारला पत्र लिहून ही वास्तू विकत घेण्याबाबत परवानगी मिळावी यासाठी पत्र पाठवल्याचे राज्याचे रोजगार हमी योजनामंत्री नितीन राऊत यांनी माध्यमांना माहिती दिली.
राज्याच्या सामाजिक न्याय मंत्रालयामार्फत ही वास्तू खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रस्तावाला तत्काळ होकार दिला. ही वास्तू राज्य सरकारच्या ताब्यात आल्यावर त्या जागेवर बाबासाहेबांचे संग्रहालय उभारण्याचा मानस आहे. दोनच दिवसापूर्वी बाबासाहेबांचा जीवनपट जगासमोर यावा यासाठी राज्य सरकारने नागपूरमध्ये कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यासाठी 130 कोटींचा निधी मंजूर केला होता. लंडनमधील ज्या घरात बाबासाहेब राहत होते त्याची रक्कमही तुलनेने कमी असल्याने सरकार 40 कोटींची वास्तू विकत घेऊ इच्छित आहे. लंडनमधील लोकांच्या दृष्टीने ते फक्त एक घर असले तरी महाराष्ट्रासाठी ती एक ऐतिहासिक जागा आहे. यामुळे या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मंत्री नितीन राऊत यांनी दिली.
परदेशातील वास्तू खरेदी करावी लागणार असल्याने यासाठी केंद्र सरकारची परवानगीची आवश्यकता असते. केंद्राची मंजूरी मिळताच राज्य सरकार लिलावात सहभागी होऊन ही वास्तू खरेदी करणार आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने मुंबईतील ब्रिटन उच्चायुक्तांनाही यासंदर्भात पत्र पाठवून याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
पुढे आणखी वाचा...