आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गीतेचे तत्त्वज्ञान वैश्विक, तिला धर्म, राष्ट्राच्या चौकटीत पाहू नये- डॉ. मोरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भगवद्गीता हा ग्रंथ जागतिक आहे. गीतेच्या तत्वज्ञानात वैश्यिक विचार आहे. त्यामुळे गीतेला धर्माच्या किंवा राष्ट्राच्या चौकटीत ठेवणे योग्य होणार नाही. राष्ट्रीय ग्रंथ घोषित करून गीतेला संकुचित करू नये, अशी भूमिका 88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ, सदानंद मोरे यांनी घेतली आहे. मूळात भारतातच संतसाहित्याबाबत अनेक समज-गैरसमज आहेत. त्यात आणखी भर घालण्याचे आपण टाळले पाहिजे असेही परखड मत त्यांनी मांडले.
ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयातील जनकवी पी. सावळाराम नगरीत भरविण्यात आलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने ज्ञानसाधना कॉलेजात आयोजित 13 व्या प्रतिभा संगम संमेलनाचे उद्‍घाटन डॉ. मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
मोरे म्हणाले, भगवद्गीतेतील विचार कोणत्याही एका धर्मापुरते मर्यादित नाहीत. त्यात संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरणारे तत्त्वज्ञान आहे. सध्या भगवद्‍गीतेला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा देण्याबाबत वक्तव्य होत आहे. मात्र, संपूर्ण मानवजातीला उपयुक्त ठरणा-या, असणा-या ग्रंथाला, तत्त्वज्ञानाला, विचाराला तुम्ही राष्ट्रीय चौकटीत ठेवू शकत नाही. धर्म, जात या मानवनिर्मित बाबी आहेत. त्यात फार जायला नको मात्र मानवजातीला उपयुक्त अशा भगवद्गीतेस आपणहूनच संकुचित करू नये असे मत मांडले.
88 व्या संमलेनाध्यक्षपदाच्या आपल्या निवडीबाबत बोलताना मोरे म्हणाले, साहित्य संमेलनाची निवडणूक पार पडेपर्यंत कुठल्याही वादात पडायचे नाही, असे मी ठरवले होते. आता ही मला वादात जायचे कारण नाही, पण मी निवडणुकीला उभा असताना, संत साहित्य हे काय साहित्य आहे का, ते जुने प्रतिगामी, देवाधर्माशी संबंधित आहे. आम्ही आधुनिक साहित्यिक आहोत. परंपरेशी आमचा काही संबंध नाही, अशा अनेक चर्चा साहित्य वर्तुळात झाल्या. मी ते ऐकून घेत होतो व चिकित्साही करीत होतो. त्यानंतर मी एका निष्कर्षापर्यंत आलो. 13 व्या शतकापासून 18 व्या शतकाच्या मध्यापर्यंत संत साहित्य हा एकच प्रवाह मराठीत प्रचलीत असल्याचे दिसून आले. संतांच्या रचनांमध्ये मराठी भाषेचे सौंदर्य दडलेले आहे. मराठी शब्दसंपत्तींचा तो अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळे 'संत साहित्य' असा वेगळा प्रकार मानून मुख्य साहित्य परंपरेपासून त्यास बाजूला सारणे योग्य नाही. अशा प्रकारची विभागणी करणे साहित्याचा संकोच ठरेल. ज्ञानेश्वरी हा निवृत्तीनंतर वाचायचा ग्रंथ नाही. मात्र ज्ञानेश्वरांनी 16 व्या वर्षी लिहिलेला हा ग्रंथ बहुतेकजण 61 व्या वर्षांपर्यंत वाचायला घेत नाहीत, हे आपल्या समाजाचे दुर्दैव आहे, असेही मोरेंनी मत मांडले.
साहित्य संमेलन हा रिकामटेकड्यांचा उद्योग आहे या भालचंद्र नेमाडेंच्या वक्त्यावाबद्दल मोरेंनी भाष्य करताना सांगितले की, अशा वक्तव्यांना व चर्चांना फार महत्त्व देण्याची गरज नाही. साहित्य किंवा संस्कृतीच्या निर्मितीसाठी काही निवांतीचे क्षण लागतातच. साहित्य संमेलन हे निवांत क्षणाची निर्मितीच आहे, त्यामुळे हा रिकामटेकड्या वेळेतलाच उद्योग आहे, असे सांगत नेमाडेंच्या वक्तव्याला एकप्रकारे दुजोराच दिला.