आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाळ-मृदंगाच्या गजरात अवयवदानाचाही अभंग; डॉ.जवादेंचा अनोखा ध्यास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- डोक्यावर गांधी टोपी, काखेला झोळी, हातात पत्रके अशा वेषातील कोणी पंढरीच्या वारीत दिसला तर ते नक्कीच डाॅ. कैलाश जवादे असणार हे समजून घ्यावे. मुंबईच्या केईएम रुग्णालयात सर्जन असलेले डाॅ. जवादे अवयवदानासाठी जनजागृतीच्या ध्येयाने झपाटलेले आहेत. त्याचसाठी ते वारकरी होऊन ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ असा संदेश देत फिरत आहेत. संत तुकारामांची पालखी १० रोजी पुण्यात आली. तेव्हा श्रीक्षेत्र घोरवाडेश्वर प्रासादिक दिंडीत ते सामील झाले. पायी वारीत येणाऱ्या हजारो माणसांना ते अवयवदानाचे महत्त्व समजावतात. शंका निरसन करतात. आपल्या दिंडीपाठोपाठ त्यांनी आता इतर दिंड्यांकडेही मोर्चा वळवला आहे. टाळ-मृदंगाच्या निनादात त्यांचे कार्य सुरू आहे. बहुसंख्य वारकऱ्यांनी तशी तयारीही केली आहे.

मानवत ते तैवान
परभणीच्या मानवत येथील डाॅ. जवादे यांनी औरंगाबादेत एमबीबीएस, तर अंबाजाेगाईत एम.एस. केले. पुढे यवतमाळला दोन वर्षे नोकरी केली. अवयव प्रत्यारोपणाच्या उच्च शिक्षणासाठी ते तैवानला गेले. जगविख्यात अवयव प्रत्यारोपण तज्ज्ञ डाॅ. शावलांग चेन यांच्या हाताखाली वर्षभर प्रशिक्षण घेतले. पुढे कोरियातही प्रा. ली यांच्याकडे धडे गिरविले. यकृत प्रत्यारोपणात विशेष प्रावीण्य मिळवले.

सामान्यांच्या सेवेचा वसा
परदेशातील प्रशिक्षण, प्रावीण्य पाहता डाॅ. जवादे यांना देशविदेशातील बड्या संस्थेत गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळाली असती. पण केईएम रुग्णालयात नोकरी पत्करून त्यांनी सेवेचा वसा घेतला. चार वर्षांच्या नोकरीकाळात त्यांना काही बाबी जाणवल्या. अवयवच उपलब्ध नसल्याने आपल्या ज्ञानाचा रुग्णांना फायदा होत नाही हे लक्षात येताच त्यांनी व्याख्याने, प्रदर्शने असे उपक्रम सुरू केले.

वारकऱ्यांनाही महत्त्व पटले
>देह नश्वर असल्याच्या धारणेपोटी वारकरी देहदानाला तयार होतात. पण अवयवदान भिन्न असल्याचे त्यांना सांगावे लागते. बऱ्याच वारकऱ्यांनी अवयवदानाची तयारी दाखवली आहे.
- डाॅ. कैलाश जवादे, अवयव प्रत्यारोपण तज्ज्ञ
मोहिमेत सहभागासाठी डाॅ. जवादेंशी 9987889390 या क्रमांकावर संपर्क साधावा.
बातम्या आणखी आहेत...