मुंबई - माजी राष्ट्रपती डाॅ. एपीजे अब्दुल कलाम यांचा स्मृतिदिन महाराष्ट्र शासनाने ‘बाल विज्ञान दिवस’ म्हणून जाहीर करावा, अशी सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सोमवारी केली. कलाम व विधान परिषदेचे माजी सभापती रा. सू. गवई यांच्या निधनाबद्दल विधान परिषदेत शोकप्रस्ताव मांडण्यात आला होता. त्या वेळी सभापती बाेलत हाेते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकप्रस्ताव मांडला. त्यावर सर्वपक्षीय गटनेते अाणि काही निवडक सदस्यांनी कलाम, गवई यांच्या कार्याविषयी विचार मांडले. मुख्यमंत्री म्हणाले, ‘देश महासत्तापूर्तीच्या जवळ असताना कलाम यांची आवश्यकता होती. नेमक्या त्याच वेळी कलाम सोडून गेले आहेत. त्यांचे काम सर्वांसाठीच प्रेरणादायी होते.’ गवई यांच्याबद्दलच्या आठवणी जागवताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘गवई यांचे नेतृत्व पक्षीय राजकारणाच्या पलीकडचे होते. सगळ्यांसोबत कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध जपत या अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाने नेहमीच सामाजिक सलोखा जपला होता.’
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी कलाम यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाल्याचे सांगितले. कलाम यांनी तरुण पिढीच्या स्वप्नांना विश्वास आणि प्रेरणा दिली. देशवासीयांच्या मानसिकतेत परिवर्तन घडवण्याचे काम केल्याचे मुंडे म्हणाले, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी कलाम यांनी देशाला ख-या अर्थाने दिशा देण्याचे काम केल्याचे म्हटले. तसेच गवई यांनी
आपल्या खंबीर नेतृत्वाने सामाजिक एकता राखण्याचे केलेले काम नेहमीच स्मरणात राहील, अशी भावनाही व्यक्त केली. कलाम यांच्या निधनाने देशाचे दुसरे चाचा गेल्याचे लोकभारतीचे कपिल पाटील म्हणाले. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी सर्व पुरोगामी गटांना एकत्रित आणण्याचे काम गवई यांनी केल्याची आठवणही त्यांनी सांगितली.
कामकाज स्थगिती
अणुशक्तीचा वापर शांततेसाठीच करण्याचे कलाम यांचे तत्त्व होते. म्हणून त्यांनी ‘स्माइलिंग बुद्धा’ अाणि ‘बुद्धा इज स्माइलिंग’ असे कोड अणुचाचण्यांसाठी निवडल्याचे जाेगेंद्र कवाडे म्हणाले. गवई यांनी ताणतणावाच्या प्रसंगांत आपल्या पानाच्या डब्यातून मार्ग काढल्याची आठवणही त्यांनी सांगितली. शिवसेनेचे सुभाष देसाई, काँग्रेसचे शरद रणपिसे, राष्ट्रवादीचे हेमंत टकले अाणि काँग्रेसचे अॅड. जनार्दन चांदूरकर या सदस्यांनीही कलाम अाणि गवई यांच्या कार्याला उजाळा दिला. कलाम यांचे पार्थिव आपल्यातून गेले आहे. मात्र, त्यांनी दिलेला आशेचा किरण अाणि आशेची ऊर्जा आपल्यात अनंत काळ राहील, असे सभापती म्हणाले. शोकप्रस्ताव संमत झाल्यानंतर श्रद्धांजली वाहून सभापतींनी सभागृह दिवसभरासाठी स्थगित केले.