आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमराठी अधिकाऱ्यांमुळे तपासाचे ५ महिने व्यर्थ, डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी माेकाटच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनी अखेर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला राज्याच्या पोलिस दलातून सात अधिकारी प्रतिनियुक्तीवर पाठवण्याची परवानगी दिली आहे. याबद्दल सरकार पाठ थोपटून घेत असले तरी गेल्या सात ते अाठ महिन्यांपासून या तपासासाठी आम्हाला मराठी अधिकारी द्या, अशी ताेंडी मागणी सातत्याने सीबीआयतर्फे केली जात होती. मात्र त्याला गृह खात्याचे अधिकारी दाद देत नव्हते. अखेर महिनाभरापूर्वी ही मागणी लेखी स्वरुपात सीबीआयने केली होती.

आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे दाभोलकरांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर सुरुवातीचे चार- पाच महिने तपासच झाला नाही. कारण सीबीआयचा हा सर्व वेळ कागदपत्रांचे भाषांतर करण्यातच गेला. मारेकऱ्यांचे धागेदोरे सापडत नसल्याने गेल्या वर्षी मे महिन्यात हा तपास सीबीआयकडे देण्यात अाला होता. मात्र, गेल्या वर्षभरात सीबीअायही तपासात फारशी प्रगती करू शकले नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीअायने सुरूवातीचे पाच महिने राज्य पोलिसांनी तयार केलेल्या मराठी कागदपत्रांचे इंग्रजीत भाषांतर करण्यात वेळ घालवला. कारण सीबीअायचे अधिकारी अमराठी असल्याने त्यांना तपासाचे कागदपत्र अभ्यासण्यात अडचणी येत होत्या. या पाच महिन्यात तपास पूर्णत: ठप्प होता. शेवटी ही दुहेरी कसरत करण्यापेक्षा हा तपास केलेल्या मराठी अधिकाऱ्यांनाच साथीला घ्यावे, असा विचार करून सीबीआयने गृहखात्याकडे तशी मागणी केली. पण मागणी मान्य होत नव्हती. त्यावर महिन्याभरापूर्वी सीबीआयने राज्य सरकारकडे लेखी पत्राद्वारे ही मागणी केली. तसेच जुलैच्या शेवटच्या आठवड्यात एकदा आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्यांदा गृहखात्याला या मागणीची स्मरणपत्रेही पाठवली होती. अखेर आता राज्य सरकारला जाग अाली असून मुख्यमंत्र्यांनी सात मराठी पोलिस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. हे अधिकारी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा तपास पूर्ण होईपर्यंत सीबीआयला सहाय्य करणार आहेत.

अधिकारी देण्यास इतका वेळ का?
तपासाला वेग यावा म्हणून राज्य सरकारने हे पहिले पाऊल टाकले आहे. मात्र, अधिकारी देण्यासाठी एवढा वेळ लागणे हे आमच्यासाठी अनपेक्षित आहे. मात्र, आता या प्रकरणाच्या तपासाला वेग यावा यासाठी आम्ही सातत्याने दबाव टाकत राहणार आहोत.
डॉ. हमीद दाभोलकर

मुक्ता यांची याचिका
सीबीआयकडे तपास सुपूर्द केल्यानंतरही तांत्रिक कारणामुळे सीबीआयला तपासात अडचणी येत असल्याची बाब लक्षात आल्यानंतर डॉ. दाभोलकरांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी गेल्या महिन्यात उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करून सीबीआयच्या तपासावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच या याचिकेद्वारे न्यायालयानेच आपल्या देखरेखीखाली एखादे तपास पथक नेमावे, अशी मागणीही केली आहे.