आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. बाबासाहेबांच्या लंडनमधील घराचे 12 नोव्हेंबरला मोदींच्या हस्ते लोकार्पण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 1920 च्या दशकात लंडनमध्ये जेथे वास्तव्यास होते ते घर महाराष्ट्र सरकारने खरेदी केले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा येत्या 12 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह आणि संशोधन केंद्राचे उद्घाटन झाले. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील निवासस्थानाच्या खरेदी व्यवहारावर महाराष्ट्र सरकारकडून ऑगस्टमध्ये शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात याबाबतची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली होती. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्मारक तयार करण्याचे राज्य सरकारचे नियोजन आहे. तसेच भारतातून लंडनमध्ये शिकायला जाणा-या मुलांना राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. अर्थस्त्रातील जगातील अग्रगण्य लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेमध्ये आंबेडकरांनी उच्च शिक्षण घेतले होते. ते विद्यार्थीदशेत असताना 1920 च्या दरम्यान या घरामध्ये राहत होते. महाराष्ट्र सरकारने 2050 चौरस फुटाचे हे तीन मजली घर ऑगस्ट महिन्यात 40 कोटी रूपयांना खरेदी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे घर 40 कोटी रुपयांत लिलावात काढण्यात आल्याची माहिती लंडनमधील ‘द फेडरेशन ऑफ आंबेडकरीज ऍन्ड बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन’ (फाबो) संघटनेने राज्य आणि केंद्र सरकारला दिली होती. त्यानंतर ही ऐतिहासिक वास्तू राज्य सरकारने विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली. याबाबत राज्य सरकारने केंद्र सरकारला पत्र लिहून ही वास्तू विकत घेण्याबाबत परवानगी मिळवली होती.
बातम्या आणखी आहेत...