मुंबई- डॉ. दाभोलकर यांच्या हत्येची योजना आकाराला येत असताना वीरेंद्रसिंह तावडे ज्या मोजक्या लोकांच्या संपर्कात होता, त्यापैकी एका व्यक्तीची मदत सीबीआय या तपासात घेत आहे. गेले दोन दिवस सीबीआयच्या चौकशी पथकामार्फत तावडे आणि त्या व्यक्तीची समोरासमोर चौकशी सुरू आहे. ही व्यक्ती सध्या या प्रकरणातील सीबीआयची मुख्य साक्षीदार असून त्याने दिलेल्या माहितीच्या आधारावरच सीबीआयने तावडेविरुद्ध फास आवळला आहे. तावडे चौकशीत पुरेसे सहकार्य करत नसल्याने सीबीआयने या प्रमुख साक्षीदारालाच समोर बसवून उलटतपासणीला सुरुवात केली आहे.
मिरज दंगलीतही हात? : मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस चाललेल्या या उलटतपासणीतून दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरण आणि २००९ सालच्या मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणासह एकूणच आरोपींच्या कार्यपद्धतीवर प्रकाश पडला असून त्यामुळे हत्येच्या कटातील अनेक दुवे समोर आल्याची माहिती सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तसेच या उलटतपासणीद्वारे मिळालेल्या माहितीमुळे सन २००९ मधील मिरज दंगलीमागेही याच गटाचा हात असल्याचा सीबीआयचा संशय बळावला आहे.
सीबीआयचा खबऱ्या व या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार असलेली ही व्यक्ती विश्व हिंदू परिषद व बजरंग दल सारख्या संघटनेत होती. याच काळात तावडे पश्चिम महाराष्ट्रात हिंदू जनजागृती समितीचे काम करत असताना २००१ पासून या दोघांचा संपर्क आला. हत्येच्या कटासाठी पिस्तुलांचा बंदोबस्त करण्याच्या प्रक्रियेत तावडेने या व्यक्तीशी बऱ्याचदा संपर्क साधला होता. आपल्या काही साधकांना काही दिवस आपल्या घरात आश्रय देण्याची गळही तावडेने या व्यक्तीला घातली होती.
औरंगाबादेत "सनातन'च्या कार्यकर्त्यांवर पोलिसांची नजरऔरंगाबाद - डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचे धागेदोरे मराठवाड्यात असल्याचा संशय असल्याने शहरातील सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांवर पोलिस लक्ष ठेवून असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. गेल्या काही महिन्यांत या प्रकरणात काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. आणखी काही संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत. शहरातील सनातन संस्थेच्या कार्यक्रमांवर आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांची नजर आहे. दाभोलकरांच्या हत्येसाठी जी दुचाकी वापरण्यात आली त्याचा संबंध औरंगाबादशी जोडला जात होता. मात्र, त्याबाबतचा तपास पुढे सरकला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
रुद्र पाटीलचा शोध, पथक सांगलीत
सांगली - डॉ. वीरेंद्र तावडे याच्या संपर्कात असलेल्या रुद्रगौडा पाटील याच्या शोधासाठी सीबीआयचे पथक जत तालुक्यात येऊन गेले. पाटील मडगाव स्फोटातील संशयित आहे. त्याचा नव्याने कसून शोध सुरू करण्यात आला आहे. कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचे धागेदोरे मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएला हवा असलेल्या रुद्रगौडा पाटील याच्यापर्यंत पोहाेचत असल्याने हा शोध सुरू करण्यात आला आहे.
मडगाव स्फोटातही तावडेचा सहभाग
तावडे गेली काही वर्षे वापरत असलेल्या एका मोबाइलच्या कॉल डिटेल्सवरून मडगाव स्फोटातही तावडेच्या सहभागावर शिक्कामोर्तब झाले आहे. १६ ऑक्टोबर २००९ रोजी स्वत: तयार केलेला एक बॉम्ब घेऊन जाताना मलगोंडा पाटील आणि योगेश नाईक यांचा मृत्यू झाला होता. स्फोटाच्या त्या दिवशीचे तावडेचे कॉल रेकॉर्ड तपासले असता तावडेच्या मोबाइलवर २५ इनकमिंग कॉलची नोंद आहे. शेवटचा कॉल तावडेने पाटील यालाच केला होता.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)