आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदूमिलमधील बाबासाहेबांचा पुतळा साडेतीनशे फुटांचाच, आॅक्टोबरमध्‍ये कामास सुरुवात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दादरमधील इंदू मिल परिसरात उभारण्यात येणाऱ्या डाॅ. बाबासाहेब अांबेडकर स्मारकाचे संकल्पचित्र. - Divya Marathi
दादरमधील इंदू मिल परिसरात उभारण्यात येणाऱ्या डाॅ. बाबासाहेब अांबेडकर स्मारकाचे संकल्पचित्र.
मुंबई- दादर येथील इंदू मिलमध्ये उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतराष्ट्रीय स्मारकाचा नवा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मंजूर केला. या आराखड्यानुसार स्मारकात बाबासाहेबांचा ३५० फूट उंच पुतळा उभारण्यात येणार आहे. आराखड्यावरुन सर्व मतभेद संपुष्टात आल्यामुळे अाता आॅक्टोबर महिन्यात प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाईल, अशी माहिती राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

मागच्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजन झाले. मात्र आंबेडकरी संघटनांमधून या अाराखड्यास विराेध झाला. स्टॅच्यु आॅफ लिबर्टीपेक्षाही (अमेरिका) उंच बाबासाहेबांचा पुतळा हवा, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांच्यासह अनेक संघटनांची मागणी होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी बडोले यांची समिती नेमली होती. सर्वांची मते विचारात घेऊन नवा आराखडा शशी प्रभू यांनी तयार केला अाहे.
स्मारकाच्या मध्यभागी बाबासाहेबांचा २५० फूट उंच ब्राझचा पुतळा असेल. तर पुतळ्याच्या चबुतऱ्याची उंची १०० फूट आहे. या चबुतऱ्यामध्ये ग्रंथालय, सभागृह, कलादालन असणार आहे. पुतळ्याचा चबुतरा कमळाच्या फुलात उभा असे डिझाईन बनवण्यात येणार आहे. पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या पायथ्याशी वस्तुसंग्राहालय असेल. या वस्तुसंग्रहालयात आठ हॉल असून त्यामध्ये बाबासाहेबांच्या जीवनाशी निगडीत सर्व पैलू चित्रांकित केले जातील. स्मारकाचे वास्तुविशारद शशी प्रभू यांच्याच पूर्वीच्या आराखड्यानुसार स्मारकाची किंमत ४२५ कोटी १६ लाख रुपये होती. मात्र त्यामध्ये बाबासाहेबांचा पुतळा ६० फूट उंचीचा होता. अाता त्याची उंची चबुतऱ्यासह ३५० फूट झाल्यामुळे स्मारकाची किंमत ५५० कोटींनी वाढेल. तसेच हा पुतळा उभारण्यासाठी जागतिक पातळीवरच्या निविदा काढण्यात येतील, अशी माहिती प्रभू यांनी दिली.
स्मारकाच्या बांधकामाची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण (एमएआरडीए) यांच्याकडे आहे. बांधकामाच्या लवकरच निविदा काढण्यात येणार आहेत. जमिनीच्या हस्तांतरणाचा वाद मिटला असून राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाने इंदू मिलचा ताबा राज्य सरकारला दिला आहे, असे बडोले यांनी सांगितले.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, गॅलरीमधून ३६० अंशातून बाबासाहेबांचे दर्शन, पंतप्रधान मोदींच्या सूचनांना तिलांजली...
बातम्या आणखी आहेत...