आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चैत्यभूमीवर जनसागराला भरती; इंदू मिल स्मारकाचे काम एक महिन्यात सुरू : मुख्यमंत्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ओखी वादळामुळे मुंबईत साेमवारपासून पाऊस व सोसाट्याचा वाऱ्याचे संकट हाेते. मात्र, त्याची तमा न बाळगता बुधवारी ६१ व्या महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर डाॅ. बाबासाहेब अांबेडकरांना वंदन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे माेठ्या संख्येने भीम अनुयायांनी हजेरी लावली. बुधवारी वरुणराजाने पूर्ण उघडीप दिली त्यामुळे चैत्यभूमीवर उत्साह होता. ‘इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक निर्माण करण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून एक महिन्याच्या आत स्मारकाचे काम सुरू करण्यात येईल,’ असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

   

सकाळी आठ वाजता राज्यपाल सी. विद्यासागर राव, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर उपस्थित होते. या वेळी राज्य सरकारच्या वतीने हेलिकाॅप्टरमधून चैत्यभूमीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.  


दरवर्षीप्रमाणे यंदाही इंदू मिल पाहण्यासाठी खुली करण्यात आली होती. तेथे प्रस्तावित आंबेडकर स्मारकाची प्रतिकृती ठेवण्यात आली होती. यंदा दादर स्टेशन ते चैत्यभूमीपर्यंत बेस्ट बसेस सोडण्यात आल्या होत्या.  


दरवर्षी महापरिनिर्वाण दिनाला १० लाखांच्या आसपास भीमानुयायी येतात. यंदा ओखी वादळाचे संकट असतानासुद्धा तितकेच भीम अनुयायी आले आहेत. मंगळवारी पाऊस आल्याने त्यांनी इतरत्र आसरा घेतला होता. दुपारनंतर गर्दी उसळल्याचे दिसते, असे महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे नागसेन कांबळे यांनी सांगितले. यंदा शिवाजी पार्कवर लाऊड स्पीकर, डीजे नव्हते. त्यामुळे ध्वनी प्रदूषणाचा त्रास बिल्कूल नव्हता. भीमानुयायांना भोजन, चहा, नाष्टा पुरवणारे सामाजिक संघटनांचे स्टाॅल दरवर्षीप्रमाणे होते.  


दादर स्थानकाला बाबासाहेबांचे नाव देण्याची मागणी

दादर रेल्वेस्थानकावर ‘डाॅ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वेस्टेशन’ असे बॅनर्स लावून भीम आर्मीने अनोखे आंदोलन केले. बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपचे ५०० युवक चैत्यभूमी परिसरातील कचरा उचलण्याचे काम स्वयंस्फूर्तीने करत होते. एल्फिन्स्टन रेल्वेस्टेशन चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी चैत्यभूमीवर वंदन रांगेचे मार्ग यंदा बदलले होते. एमएमआरडीएने इंदू मिलमधील आंबेडकर स्मारकाच्या प्रस्तावित आराखडा नव्याने प्रसिद्ध केला. त्यातील बाबासाहेबांच्या पुतळ्यावर रिपब्लिकन सेनेच्या सदस्यांनी आक्षेप घेत घोषणा देऊन नाराजी व्यक्त केली.   

 

पुस्तक विक्रेत्यांना फटका  
शिवाजी पार्कवर महापरिनिर्वाण दिनासाठी पालिका ५०० स्टाॅल बनवते. यात पुस्तक विक्रेते मोठ्या संख्येने असतात. यंदा सर्व स्टाॅल बुक झाले होते. मात्र, मंगळवारी पाऊस आल्याने सर्व स्टाॅल उद्ध्वस्त झाले. त्यामुळे ३ दिवसांत होऊ शकणाऱ्या सुमारे ३ कोटींच्या पुस्तक विक्रीला विक्रेत्यांना मुकावे लागले, अशी माहिती आंबेडकरी नेते, लेखक ज. वी. पवार यांनी दिली. 

 

चैत्यभूमीवरील फोटो पाहाण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्‍सवर....

बातम्या आणखी आहेत...