आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री रणजित पाटील यांच्या अडचणीत वाढ, स्वीय सहायकाच्या लाच प्रकरणाची नामुष्की

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या खात्याचे राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या बेहिशेबी संपत्तीच्या चौकशीचे प्रकरण ताजे असतानाच त्यांच्या स्वीय सहायकास लाच प्रकरणी अटक झाल्याने मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

पाटील यांनी विधानपरिषदच्या निवडणुकवेळी प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती दडवल्याची उघड झाले. ज्या गृहविभागाचे पाटील मंत्री आहेत त्याच विभागाच्या अखत्यारित असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकरवी त्यांची चौकशी सुरू आहे.
पाटील यांच्याकडून बेहिशेबी मालमत्ता दडवल्याचा प्रकार ताजा असतानाच त्यांचा स्वीय सहायक मिलिंद कदम याला ४५ हजार रुपयांची लाच घेताना अटक झाली आहे. मिलिंद कदम विधी व न्याय विभागात कायदा सल्लागार अधिकारी आहे. तर रणजीत पाटील या विभागाचे राज्यमंत्री आहेत. त्यामुळे आपसूकच पाटील यांच्यावर याप्रकरणी संशयाची सुई जात आहे.
लागोपाठच्या दोन वादग्रस्त प्रकरणामुळे पाटील गोत्यात आले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात राज्यमंत्र्याच्या पीएला अटक झाल्याने याचे पडसाद सभागृहात उमटू शकतात. त्याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनाही द्यावे आहे. मंत्र्यांनी स्वीय सहायकांना अद्याप नियुक्तीची पत्रे दिलेली नाहीत. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेला कदम आपला स्वीय सहायक नाही असे रणजित पाटील म्हणत असले तरी त्यात तथ्य नाही.
अर्थमंत्री मुनगंटीवार, शिक्षणमंत्री तावडे आणि महसूलमंत्री खडसे या मातब्बरांशी सध्या मुख्यमंत्र्यांचा सामना आहे. अशा काळात सीएमओच्या मंत्र्यांवर झाडाझडतीचा प्रसंग ओढावल्याने मुख्यमंत्र्यांची गोची होणार आहे.
सापळा रचायला मीच सांगितले

माझ्याकडे विधी व न्याय विभाग असल्यामुळे ब्रीफिंगसाठी मिलिंद कदम येत, परंतु ते माझे स्वीय सहायक नाहीत.कदम याच्या तक्रारी आल्या होत्या.त्यानंतर मी आणि मुख्यमंत्र्यांनीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागास सापळा लावण्यास आदेश दिले होते. -डॉ. रणजित पाटील, राज्यमंत्री.