आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता धर्मांतर बंद, स्वधर्मात परत जाणार, डाॅ. तुमराव यांच्या माेहिमेला 50 हजार अादिवासींची साथ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘कुणीही उठावं आणि विकासाच्या नावाखाली आदिवासींचं धर्मांतर करावं, अशी भारतातली आज स्थिती आहे. पण आमचा धर्म पुस्तकात नाही, तो निसर्गात आहे. यापुढे आदिवासी धर्मांतर नाही तर स्वधर्माकडे म्हणजे निसर्गधर्माकडे परत जाणार आहेत. स्वधर्माच्या चळवळीनं आदिवासींच्या सर्व जमाती एका झेंड्याखाली येतील. आमच्या राजकीय लढाईला बळ मिळेल. त्यातून मूलनिवासींच्या हक्काचं संरक्षण होईल. म्हणून आदिवासींनी पुन्हा आपल्या धर्माकडे परतावे यासाठी निसर्गधर्म स्वीकाराची चळवळ सुरू केली अाहे,’ अशी माहिती डाॅ. विनायक तुमराम यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिली.

सन २००१ मध्ये मी ‘आदिवासी धर्म’ प्रस्थापनेची घोषणा केली. २०१६ मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील दिभना (माल) येथे धर्मदीक्षेचा पहिला सामूहिक सोहळा झाला. आजपर्यंत ५० हजार बांधवांनी निसर्गधर्माचा स्वीकार केला. देशात ११% आदिवासी आहेत. पाच वर्षांत त्यांच्यापर्यंत निसर्गधर्माच्या १६ प्रतिज्ञा नेण्याचा माझा संकल्प आहे, असे सांगून डाॅ. तुमराव यांनी निसर्गधर्माबाबत मुद्देसूद माहिती दिली.

अनेक धर्मांतर चळवळी अपयशी, तरीही करताेय धाडस : तुमसर
- आदिवासींमध्ये चालीरीती, भाषा, देवता, सण, श्रद्धा भिन्न-भिन्न आहेत. मात्र, सर्व आदिवासी निसर्गपूजक आहेत. निसर्ग कोणाप्रति भेदभाव करत नाही. समता हा त्याचा धर्म अाहे. त्याच आमच्या निसर्ग धर्माकडे आम्हाला परतायचंय. या चळवळीनं आमच्या साडेपाचशे जमाती एका झेंड्याखाली येतील.
- भटक्या - विमुक्तांना बौद्ध धर्माची दीक्षा देण्याचा प्रयत्न लक्ष्मण माने यांनी केला. ओबीसी समाजाने बौद्ध धर्म स्वीकारावा यासाठी हनुमंत उपरे यांनी चळवळ केली. मराठा समाजाने मध्यंतरी शिवधर्माची प्रतिष्ठापना केली. या सर्वांच्या यशापयशाचा इतिहास ताजा आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सोडले तर धर्मांतर चळवळी अपयशी ठरल्यात. तरीसुद्धा आम्ही समजून-उमजून हे धाडस करतोय.
- धनगर समाज ‘एसटी’चे आरक्षण मागतोय. बोगस महादेव कोळ्यांनी आदिवासींचे हक्क पळवलेत. निसर्ग धर्माच्या चळवळीनं आदिवासींना जागं करण्याचा प्रयत्न आहे. आदिवासी बोलू लागला तर सर्वांची पंचाईत होईल. त्यासाठीच स्वधर्माकडे परत जाण्याचा ऐतिहासिक प्रयोग मांडलाय.
- अनुसूचित जमातीला ७ %आरक्षण आहे. नोकऱ्यांनी आदिवासीचा भौतिक विकास होईलही. पण आंतरिक विकासाचं काय? ख्रिश्चन, हिंदू, मुस्लिम, शीख प्रत्येक धर्म आदिवासींना आपल्यात ओढायला बघतोय. बाहेरच्यांची लेबलं त्यांनी का बरं लावायची?
- खरं तर आदिवासी इथले मूलनिवासी. पण तुम्ही आम्हाला ‘वनवासी’ ठरवलं. आदिवासी न म्हणता ‘वंचित’ म्हणता. का? कारण उद्या आम्ही बोलू लागलो तर तुमचे प्रभुत्व अबाधित राहणार नाही. म्हणून आमची ओळख पुसण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. हे तुमचं सांस्कृतिक राजकारण आम्हाला आता उमगलंय.
- आदिवासींचे पुढारी तुम्ही ठरवता. कायदेमंडळात ते तोंडही उघडत नाहीत. म्हणून अाम्ही राजकीय लढाई कायम हरतोय. आता आम्ही नव्या धर्म प्रवर्तनाच्या लढाईचा बिगुल वाजवलाय. यात हरलो तरी आमची ओळख आम्हाला हाेईलच.
- आदिवासींचं तत्त्वज्ञान बंदुकीचं नाही. इच्छा नसताना आमच्या हाती बंदुका देत राहिले. नक्षलवादाने आमचे प्रश्न सुटणार नाहीत. म्हणून चंद्रपूरच्या ‘आदिवासी धर्मानुसंधान ट्रस्ट’ने स्वधर्मात परतण्याची हाक दिली आहे.

डाॅ. तुमराव निवृत्त प्राध्यापक
डाॅ. विनायक तुमराव ब्रह्मपुरी ( चंद्रपूर) हे निवृत्त प्राध्यापक असून त्यांनी पंधरा पदव्या मिळवल्या अाहेत. ‘पराधन’ या आदिवासी जमातीपैकी ते आहेत. ‘आदिवासी, धर्म कायदा आणि राजकीय पक्ष’ हा त्यांचा ग्रंथ प्रकाशित आहे.
बातम्या आणखी आहेत...