आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: अरबी समुद्रात बुडतेय जहाज, नेव्हीने वाचवले 20 खलाशांचे प्राण!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अरबी समुद्रात मुंबई किनार्‍याजवळ जिंदाल कामाक्षी हे खासगी मालवाहू जहाज बुडू लागल्याचे लक्षात येताच नाैदलाच्या जवानांनी तत्परतेने मदतकार्य करत 20 खलाशांची सुखरूपपणे सुटका केली आहे. सोमवारी सकाळी घडलेल्या या घटनेला संरक्षण मंत्रालयाने दुजोरा दिला असून हे जहाज बुडण्यापासून वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मुंबईच्या किनार्‍यापासून 40 सागरी मैल अंतरावर तर वसई किनार्‍यापासून 25 सागरी मैल अंतरावर असलेल्या जिंदाल कामाक्षी या जहाजावरून रविवारी रात्री उशिरा मदतीचा संदेश नौदलाला प्राप्त झाला. हा संदेश मिळताच त्वरित हालचाली करत नौदलाने जहाजावरील सर्वच्या सर्व 20 खलाशांची सुखरूप सुटका केली.

नेमके काय घडले ?-

रविवारी रात्री 11.10 वाजता नाैदलाला संदेश आला की, या एका बाजूला पाणी भरू लागल्याने हे जहाज २० अंशात तिरके झाले आहे. त्यानंतर पथकाने बचाव कार्याला सुरुवात करण्यापूर्वी एक विमान पाठवून हवामानाचा अंदाज घेतला. संपूर्ण परिस्थितीचा अंदाज घेऊन रात्री साधारण 2.45 वा. ‘आयएनएस मुंबई’ आमची विनाशिका या बचावकार्यासाठी धाडली. सकाळी नऊच्या सुमारास सी किंग हेलिकाॅप्टर्सच्या साहाय्याने जहाजावरील सर्वच्या सर्व म्हणजे 20 जणांची यशस्विरीत्या सुटका करण्यात आली. या खलाशांना आयएनएस शिक्रा या नेव्हीच्या हवाई तळावर सुखरूपपणे आणण्यात आले. यातील दोन खलाशी किरकोळ जखमी झाल्याने त्यांच्यावर नौदलाच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले, अशी माहिती नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन डी.के.शर्मा यांनी दिली.

चार वर्षांपूर्वीची पुनरावृत्ती -

चार वर्षांपूर्वी 31 जुलै 2011 रोजी समुद्री वार्‍यात भरकटून ‘एमव्ही पवित’ हे जहाज मुंबईच्या जुहू समुद्र किनार्‍यावर लागले होते. ओमानच्या किनार्‍यावरून निघाल्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे हे जहाज भरकटत भरकटत मुंबईच्या किनार्‍यावर आले होते. त्यावर असलेल्या 13 खलाशांचीही अशाच पद्धतीने सुटका करण्यात आली होती. एमव्ही पवित मुंबईच्या किनार्‍याला लागण्याच्या एका महिनाभरापूर्वी एमव्ही विजडम हे आणखी एक मालवाहू जहाजही मुंबईच्या किनार्‍यानजीक आढळल्यामुळे घबराट पसरली होती.

आता बचाव जहाजाचा : सध्या या जहाजाला बुडण्यापासून वाचवण्याचे प्रयत्न सुरू असून सध्या समुद्राच्या त्या भागातील वातावरण पाहता परिस्थिती अधिक बिकट होण्यापूर्वी हे जहाज वाचवण्याचे प्रयत्न नौदलाने सुरू केले आहेत. जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदराकडे जात होते.
पुढे स्लाईड्सच्या माध्यमातून पाहा, मुंबईजवळ अरबी समुद्रात बुडत असलेले जिंदल-कामाक्षी जहाज...
बातम्या आणखी आहेत...