आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाभा केंद्राच्या परिसरात ड्रोनने व्हिडिओ रेकॉर्डिंग, सुरक्षा व्यवस्थेला भगदाड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अत्यंत चोख सुरक्षा व्यवस्था असलेल्या भाभा अणुसंशोधन केंद्राच्या (बीएआरसी) सुरक्षा व्यवस्थेला भगदाड पाडण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. एका हाउसिंग वेबसाइटच्या तीन एक्झिक्युटिव्हजनी पोलिसांची परवानगी न घेताच बीएआरसी आणि टाटा मुलभूत संशोधन संस्थेच्या (टीआयएसएस) परिसराची ड्रोनच्या साह्याने व्हिडिओ रेकॉर्डिंग केली.
देवनार डेपोस्थित टीआयएसएस संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ एक टूरिस्ट कार उभी असल्याचे एका प्राध्यापकाने पाहिले. तेथे तीन लोक एक ड्रोन सुमारे २० मीटर उंचीवर उडवून बीएआरसी आणि टीआयएसएस परिसराची व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्या प्राध्यापकाने पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती देऊन सावध करण्याबरोबरच त्यांचे व्हिडिओ फुटेजही रेकॉर्ड केले. त्यानंतर त्या प्राध्यापकाने त्यांना हटकल्यावर ते कार घेऊन फरार झाले. त्या प्राध्यापकाने व्हिडिओ फुटेजची क्लिप तपासणीसाठी पोलिसांच्या हवाली केली आहे.

ते एक्झिक्युटिव्ह
ड्रोनच्या साह्याने व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारे तीन लोक एका हाउसिंग वेबसाइटचे एक्झिक्युटिव्ह आहेत. तरीही प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्यात येत आहे. यापूर्वी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधारांपैकी एक डेव्हिड हेडलीने या परिसराची रेकी केली होती. शिवाय यापूर्वी तब्बल २५ वेळा सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न झाला होता.

प्रतिबंधित आहे क्षेत्र
बीएआरसी हे देशाचे पहिले अणुसंशोधन केंद्र आहे. २० जानेवारी १९५७ रोजी पं. नेहरूंनी त्याचे उद्घाटन केले होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी १२ जानेवारी १९६७ रोजी त्याला या केंद्राचे संस्थापक होमी भाभांचे नाव दिले होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे. सुरक्षेच्या कारणामुळे हे केंद्र प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.