आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळावर कोरडवाहू शेतीची उपाययोजना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यामध्ये निर्माण झालेल्या दुष्काळ परिस्थितीवर उपाययोजना म्हणून कोरडवाहू शेतीची वर्षभरापूर्वी केलेली घोषणा गेल्या आठवड्यामध्ये अखेर मंजूर करण्यात आली. कमीत कमी पाण्यामध्ये पिके घेणे आणि ती टिकवणे, मिश्र पिके, आलटूनपालटून पिके, ठिबक सिंचन अशा काही आधुनिक आणि पारंपरिक पद्धतींचा संगम यामध्ये करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात कोरडवाहू शेतीला प्रोत्साहन देणारे आदेश काढले असले तरी कृषी विभागाने पुढाकार घेऊन रब्बी हंगामासाठी काही दुष्काळी तालुक्यांमध्ये ही योजना राबवण्यात सुरुवात केली होती. आता पिके वाढल्यावरच ही योजना किती यशस्वी झाली याचे मोजमाप करता येईल, असे कृषी विभागातल्या एका अधिकार्‍याने सांगितले. मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार दुष्काळी तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक हजार हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे. आतापर्यंत काही ठिकाणी ज्वारी, तूर आणि इतर पिकांची लागवड करण्यात आली आहे.
दुष्काळी भागांमध्ये पाण्याची खाली गेलेली पातळी लक्षात घेऊन मातीमध्ये असलेल्या ओलाव्याच्या साहाय्याने ही पिके घेण्याचा प्रयत्न यामध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे. प्रत्येक भागातील हवामान आणि जमिनीचा पोत वेगळा असून त्याला योग्य अशी पिके घेण्याचाच सल्ला शेतकर्‍यांना देण्यात आला आहे. त्यामुळे पाणी नसलेल्या ठिकाणी अतिरिक्त पाणी
लागणारी पिके घेऊन जमिनीची मोठ्या प्रमाणावर होणारी धूप थांबवता येऊ शकते, असे ही या विभागातील अधिकार्‍याने सांगितले.


आलटूनपालटून पीक घेण्याच्या सूचना
जमिनीचा कस कायम राखण्यासाठी पिके आलटून पालटून घेण्यासाठीही शेतकर्‍यांना सूचना देण्यात आल्या आहेत. पाटाच्या वाहत्या पाण्यापेक्षा बंद पाइप किंवा ठिबक सिंचनाचा वापर करून पिकांना पाणी देण्यासाठीही शेतकर्‍यांना यामध्ये प्रोत्साहन देण्यात येईल. त्यामुळे पाण्याच्या बचतीबरोबरच जमिनीचा पोतही कायम राहील, असे त्या अधिकार्‍याने सांगितले. मात्र, यामध्ये शेतकर्‍यांचा सहभाग महत्त्वाचा असून त्यांनीही केवळ उसासारख्या पिकामागे न जाता विविध पिकांचा पर्याय बघायला हवा. त्यासाठी त्यांच्यामध्ये जनजागृती करण्याचेही काम कृषी विभागातर्फे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.