आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर, १९,०६९ गावांत पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील बहुतांश भागातील सरासरी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याने सरकारने मंगळवारी राज्यात दुष्काळसदृश स्थिती जाहीर केली. ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली.

राज्यातील १९ हजार ६९ गावांतील खरीप पिकांची हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. त्यामुळे या गावांमध्ये टंचाईसदृश स्थिती जाहीर केली आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अाठवडाभरात केंद्र सरकारकडे तपशीलवार प्रतिवेदन पाठविण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांत ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडल्याने ५० हजार हेक्टर क्षेत्रावर भात, नागली, केळी, डाळिंब, द्राक्षे, सोयाबीन आणि अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना पाऊस, हवामान आणि पेरणीचा अचूक अंदाज येण्यासाठी मंडल स्तरावर २ हजार ६५ ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र स्थापण्यात येणार आहेत, डिसेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
औरंगाबादमध्ये सर्वाधिक टंचाईग्रस्त गावे
हंगामी पैसेवारीनुसार नाशिक विभागात १ हजार ७८२ गावातील पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. 15 नोव्हेंबर रोजी झालेल्या सुधारीत हंगामी पैसेवारीनुसार औरंगाबाद जिल्ह्यातील ८ हजार ४ गावांमधील, अमरावती विभागातील सर्व म्हणजे ७ हजार २४१ गावांमधील आणि नागपूर विभागातील २ हजार २९ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे.

महिनाअखेरीस आढावा बैठक औरंगाबादेत
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी औरंगाबाद आणि अमरावतीमध्ये २७ किंवा २९ नोव्हेंबर रोजी बैठक घेणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

पंचनाम्यांची गरज नाही
नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पंचनामे करण्याचीही गरज नाही. यापुढे मदत व पुनवर्सन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमिती पीकपाणी स्थितीचा नियमित आढावा घेईल.