आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतिम पैसेवारीपूर्वीच टंचाई परिस्थिती जाहीर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सुधारित हंगामी पैसेवारी आणि अंतिम पैसेवारी जाहीर झाल्यानंतर टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करणे अपेक्षित असते. मात्र राज्य सरकारने दुष्काळाची गंभीर स्थिती पाहूनच अंतिम पैसेवारी येण्यापूर्वीच टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासनादेशही जारी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिली. राज्यात 3905 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे. यामध्ये औरंगाबाद विभागातील 1674 गावांचा समावेश आहे.

औरंगाबाद, पुणे, नाशिक व कोकण विभागाची खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी 15 डिसेंबर रोजी घोषित करण्यात आली होती, तर नागपूर व अमरावती विभागाची अंतिम पैसेवारी 15 जानेवारी रोजी घोषित झाली. मात्र रब्बी हंगामाची सुधारित हंगामी पैसेवारी 31 जानेवारी, 15 फेब्रुवारी रोजी घोषित करण्यात येते, तर अंतिम पैसेवारी 15 मार्चला घोषित करण्यात येते.

दुष्काळी स्थिती पाहून सरकारने रब्बीची सुधारित पैसेवारी घोषित होण्यापूर्वीच टंचाईसदृश परिस्थिती जाहीर केली. औरंगाबाद विभागातील 646 गावांतील रब्बीची पैसेवारी जाहीर करण्यात आली असून 591 गावांमध्ये 50 पेक्षा कमी पैसेवारी आहे. जालना जिल्ह्यात 457 गावे, परभणीत 503 गावे, हिंगोलीत 98, बीडमध्ये 643, लातूरमध्ये 117 आणि उस्मानाबादमधील 375 गावांचाही त्यात समावेश आहे. 1165 गावांची पैसेवारी मात्र 50 पैशांपेक्षा जास्त आहे. नाशिक विभागातील नगरमध्ये 1017 गावांची पैसेवारी 50 पेक्षा कमी आहे.