आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ड्रगमाफिया लेडी: एकमेकांना गोवण्याच्या नादात सारेच अडकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘ड्रगमाफिया लेडी’ शशिकला ऊर्फ बेबी पाटणकरची या धंद्यात चांगली कमाई होत होती.. तरीही तिला अंमली पदार्थाच्या तस्करीच्या धंद्यातून बाहेर पडायचे होते.. पाेलिस कर्मचारी धर्मराज काळोखे तिचा ‘पार्टनर’ हाेता. बक्कळ कमाईच्या लालसेने ताे मात्र तिला या ‘चक्रव्यूहा’तून बाहेर पडू देत नव्हता. अखेर तिला मदत करण्याच्या नावाखाली पाच पोलिस पुढे आले. पण त्यांचाही हेतू पैसे कमावण्याचाच होता.. त्यांना निवृत्त होण्याआधी जाता जाता एखादा मोठा ‘हात मारायचा’ होता.. पण पैशांच्या लोभापायी यापैकी प्रत्येकाने आपण नामानिराळे राहून एकमेकांना गोवण्याचा प्रयत्न केला आणि सगळेच गोत्यात आले.. चित्रपटात शोभावी अशी ही कथा आहे ड्रग्ज तस्कर आणि सध्या कोठडीत असलेली बेबी हिची.. क्राइम ब्रँचकडून जाणून घेतलेली ही कथा ‘दिव्य मराठी’च्या वाचकांसाठी..

बेबी पाटणकर हिला अंमली पदार्थ तस्करीत मदत केल्याप्रकरणी पाच पाेलिसांना मुंबईत अटक करण्यात अाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास गोखले, पोलिस निरीक्षक गौतम गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक सुधाकर सारंग, सहायक पोलिस उपनिरीक्षक ज्योतीराम माने व पोलिस शिपाई यशवंत पार्टे अशी त्यांची नावे अाहेत. त्यांच्याविराेधी राबविण्यात अालेल्या माेहिमेचे नाव हाेते ‘आॅपरेशन चेकमेट'. या योजनेत प्रत्येकच पाेलिस कर्मचारी एकमेकाचा जण मित्र असल्याचे भासवत शत्रूची भूमिका वठवत होता.

ठरल्यानुसार, काळोखेच्या साता-यातील घरी ठेवलेल्या ११० किलो ड्रग्सची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार ९ मार्च रोजी धर्मराजेला सातारा पोलिसांनी अटक केली. धर्मराजचा गेम करून त्याला तुरुंगात पाठवल्याने बेबीचा हेतू पूर्ण झाला होता. त्याबदल्यात बेबीकडून पाच पाेलिसांना घसघशीत मोबदला दिला जाणार होता. शिवाय हे प्रकरण मुंबई बाहेरचे असल्याने मीडियाचे फारसे लक्ष जाणार नाही, असा या पाच पोलिसांचा अंदाज होता. मात्र काळोखेच्या अटकेनंतर माध्यमांनी हे प्रकरण जोरात लावून धरले. आणि इथेच ही योजना फसली.

काळोखेच्या चौकशीत बेबी पाटणकरचे नाव पुढे अाले. धास्तावलेल्या बेबीने मग त्या पाच पोलिसांशी संपर्क साधला आणि अटक टाळण्याचे प्रयत्न सुरू केले. या दरम्यान सुहास गोखले व बेबी यांचे किमान २० वेळा फोनवरून संभाषण झाले. तर, काॅन्स्टेबल यशवंत पार्टे आणि बेबी पाटणकर तब्बल २०० वेळा फोनवरून एकमेकांशी बोलल्याची बाब पुढील तपासातून निष्पन्न झाली आहे. निलंबित पोलिस निरीक्षक गौतम गायकवाड आणि बेबी यांचेही १२० वेळा फोनवरून संभाषण झाले होते. फारच गवगवा झाल्याने मग बेबीला फरार करण्यात अाले. मात्र दबावानंतर तिला अटक झाली व सा-यांच्याच पापाचा घडा भरला.

दबाव वाढल्याने बेबी अटकेत
पोलिसांनीच बेबीला पळून जाण्यासाठी मदत केली आहे, ही बाब बातम्यांमध्ये येऊ लागली. सावधगिरी म्हणून गोखलेंनी आपल्या वरिष्ठांना या प्रकरणाची कल्पना दिली. या प्रकरणातून अापली ‘एक्झिट’ व्हावी, असा त्यामागे हेतू. पण जसजसा पोलिसांवरील दबाव वाढू लागला तसतशी बेबी अटक गरजेची होऊन बसली. अखेर तिलाही अटक करण्यात आली. आणि मग सगळ्याच बाबींचा उलगडा झाला.