आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Due To Bad Authours My Literature Demanding Bhalchandra Nemade

वाईट लेखकांमुळे माझ्या साहित्याला मागणी, ‘कोसलाकार’ भालचंद्र नेमाडे यांचा टोला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘पॉप्युलरचे प्रकाशक म्हणून रामदास भटकळ यांचा जैन धर्मातील तत्त्वासारखा सम्यक
विचार नेहमीच कौतुक वाटायला लावणारा आहे. त्यांच्याकडे माझ्याबरोबर माझ्या शत्रूंचीही पुस्तके छापली जात. गंगाधर गाडगीळ, वा. ल. कुलकर्णी वा अगदी भाऊ पाध्येंचीही पुस्तके ते छापत. मात्र, या लेखकांमुळेच वाईट लेखन कळून माझ्या वा एकंदरच चांगल्या लेखनाला मागणी का आहे हे मला कळत गेले,’ असा नर्मविनोदी टोला ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे यांनी शुक्रवारी लगावला. रामदास भटकळ यांच्या ८० वर्षे पूर्तीनिमित्त मुंबईत मुक्त शब्द मासिकातर्फे आयोजित कृतज्ञता सत्काराप्रसंगी ते बोलत होते.

‘कोसला’ कादंबरी नुकतीच छापून आली होती तेव्हा गिरगावात मी फुटपाथवर पुस्तके पाहत होतो. भटकळ यांनी तेव्हा हे पुस्तक घेतले व माझ्या कादंबरीवर स्वाक्षरी घेण्यासाठी मला बोलावणे धाडले. त्या वेळी मला कळाले, इतका मोठा प्रकाशक मला बोलावतो आहे म्हणजे नक्कीच मी चांगला लिहीत असणार. असो. पण भटकळांनी माझ्याबरोबर अनेकांना सामावून घेतले आणि त्यांनी त्यांचा ‘गांधीवाद’ सिद्ध केला,’ असे नेमाडे यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ समीक्षक पुष्पा भावे यांनी भटकळ यांची मुलाखत घेत त्यांच्यातील अंतरंग उलगडवले. त्यांच्या ‘मोहनमाया’ या गांधीजींवरील पुस्तकावरही चर्चा रंगली. सुरुवातीस ‘महात्मा गांधी आणि वर्तमान’ या विषयावर डॉ. अरुणा पेंडसे, लेखक राजन गवस यांनीही विचार मांडले.

‘वादाचे धनी’
‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांनी यापूर्वीही अशीच वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. काही
दिवसांपूर्वीच पुण्यात बोलताना ‘साहित्य संमेलने हे रिकामटेकड्यांचे उद्योग’ असल्याचे
सांगत त्यांनी वाद ओढवून घेतला होता.