आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किचकट निधी वाटपाने कुपोषण प्रमाणात वाढ; आठ कोटी मंजूर, पण एक रुपयाही खर्च नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पालघरसारख्या आदिवासी पट्ट्यात कुपोषणावर मात करण्याची मुख्य जबाबदारी ही अंगणवाडी सेविकांवर आहे. मात्र, त्यांना निधीच पुरवला नसल्याने या वर्षी या भागात कुपोषणात वाढ झाल्याचे समोर आले आहे. या वर्षी मंजूर केलेले ८ कोटी रुपयांपैकी एकही रुपया त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. याला निधी वाटपाची किचकट प्रक्रिया कारणीभूत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे ही पद्धत आता बदलली जाणार आहे.

कुपोषण निर्मूलनासाठी आदिवासी विभागाकडून महिला व बाल कल्याण विभागाला ८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. शिवाय तो वर्गही करण्यात आला. हा निधी पुढे एकात्मिक बाल विकास आयुक्त यांना वर्ग झाला. तेथून पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अशा पद्धतीने ते वर्ग केला जातो. त्यानंतर निधी प्रत्यक्षात अंगणवाडी सेविकांना मिळतो. मात्र, या वर्षी निधी मंजूर होऊनही तो जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांपर्यंतच पोहोचला. तेथून प्रत्यक्ष अंगणवाडी सेविकांपर्यंत पोहोचलाच नाही, अशी माहिती आदिवासी विभागाचे सचिव राजगोपाल देवरा यांनी दिली.

पालघरमध्ये २ हजार ५६७ अंगणवाड्या आहेत. बालकांचे वजन, पोषण आहार, किशोरवयीन मुलींना आरोग्य समुपदेशन, गर्भवती महिलांचे समुपदेशन, लोहयुक्त गोळ्या, आहार पुरवठा, लसीकरण याची अंमलबजावणी या अंगणवाड्यांमार्फत केली जाते. यासाठी या निधीचा वापर केला जातो. शिवाय अंगणवाडी सेविकांचे पगारही यातूनच होतात. त्यामुळे ज्या प्रणालीमार्फत निधी दिला जातो ती किचकट असल्याचे आता सरकारच्या लक्षात आले आहे.

यापुढे पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टिम अंमलात आणली जाणार आहे. त्यानुसार आदिवासी विभागाने महिला व बाल विकास विभागाला वर्ग केलेला निधी एकात्मिक बाल विकास आयुक्तांमार्फत थेट अंगणवाडी सेविकांपर्यंत पोहोचण्याची सोय केली जाईल, अशी माहिती महिला व बालविकास विभागाचे सचिव संजीवकुमार यांनी दिली. याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सप्टेंबर अखेरपर्यंत ६१० कुपोषणाचे बळी
कुपोषणामुळे पालघरमध्ये सप्टेंबरअखेर ६१० बालकांचा मृत्यू झाला आहे, तर हजाराच्यावर बालके कुपोषित असल्याचा अंदाज आहे. लहान वयात लग्न, त्यानंतर लागोपाठची बाळंतपणे, पोषक आहाराचा आभाव, बेरोजगारी या कारणांमुळे कुपोषणाच्या संख्येत वाढ होत आहे.
बातम्या आणखी आहेत...