आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज’मैत्रीमुळेच शिवसेनेकडून नरेंद्र मोदींच्या नावाला विरोध!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भाजपतर्फे आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे करण्याची योजना असली तरी, रालोआतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेने मात्र सुषमा स्वराज यांच्या नावाचा आग्रह धरून मित्रपक्षाची कोंडी केली आहे. नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची मैत्रीच त्याला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

मराठी माणसाच्या मुद्द्यावरून राजकारण सुरू केलेल्या शिवसेनेने ‘हिंदुत्व’ हा मुद्दा हाती घेऊन राज्यात आणि केंद्रात भाजपला साथ दिली. त्यापोटी त्यांना सत्तेत भागीदारीही मिळाली. मोदी हे कट्टर हिंदुत्ववादी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चांगले मित्रही. बाळासाहेबांनी मोदी यांची जाहीरपणे स्तुती केलेली आहे. शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर मोदी यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांचे सांत्वनही केले होते.
बाळासाहेबांच्या निधनानंतर मात्र मोदी यांचे ‘मातोश्री’शी सख्य कमी झाल्याची चर्चा आहे. राज यांनी गुजरातचा दौरा करून मोदी आणि गुजरातच्या विकासाची प्रशंसा केली होती. विधानसभा निवडणुकीत विजय प्राप्त केल्यानंतर शपथविधी समारंभास मोदी यांनी राज यांच्याप्रमाणेच उद्धव, आदित्य यांनाही निमंत्रित केले होते. परंतु त्यांच्यात चर्चा झाली नाही. दरम्यान, पाकिस्तान संघाला भारतात खेळण्यासही मोदी यांनी परवानगी दिली. या सर्व गोष्टींमुळे शिवसेना मोदींवर नाराज आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातूनही त्यांच्यावर टीका करण्यात आली.

सुषमा स्वराज सर्वपसंतीच्याच उमेदवार
सुषमा स्वराज या महिला असून आघाडीतील सगळ्या पक्षांना एकत्र घेऊन पुढे जाऊ शकतात. त्यांच्या नावाला कोणी विरोधही करणार नाही. शिवसेनाप्रमुखांनी त्याचमुळे सुषमा स्वराज यांना पाठिंबा दिला असल्याने शिवसेनेचा त्यांनाच पाठिंबा असेल - नीलम गो-हे, आमदार, शिवसेना

बाळासाहेबांनीही सुचवले होते सुषमांचे नाव : राऊत
भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी पंतप्रधानपदासाठी मोदींचे नाव पुढे केले, तर राम जेठमलानी यांनीही त्याला पाठिंबा दिला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेना मोदींच्या नावाचे समर्थन करील अशी अपेक्षा होती. परंतु पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शिवसेनेचा सुषमा स्वराज यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले. बाळासाहेब ठाकरे यांनीही स्वराज्य याच योग्य उमेदवार असल्याचे म्हटले होते, याची आठवणही राऊत यांनी करून दिली.