आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'याकूब'मुळे रखडली मराठवाड्याची चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन आणि त्याच्या फाशीसंदर्भात वादग्रस्त विधान करणारा अभिनेता सलमान खान या दोघांना साथ देणा-या काँग्रेस आमदारांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेच्या सदस्यांनी बुधवारी विधानसभेत केली.

काँग्रेसच्या काही आमदारांनी याकूबची फाशी रद्द करण्याची मागणी राष्ट्रपतींकडे केली आहे. या आमदारांची नावे सरकारने जाहीर करावीत, अशी मागणी शिवसेना आमदारांनी लावून धरली. सलमान खानच्या गळ्यात फाशीचा दोर लटकवलेले छायाचित्र शिवसेना सदस्यांनी विधानसभेत झळकावले. सलमानची पाठराखण करणा-या आमदारांच्या निलंबनाची मागणीही करण्यात आली. याप्रश्नावरून तब्बल सहा वेळा विधानसभेचे कामकाज तहकूब करावे लागले, तरीही शिवसेना आमदारांची आक्रमकता कमी न झाल्याने अखेरीस दुपारी पावणेदोनच्या सुमारास दिवसभराचे कामकाज स्थगित करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतला.

बुधवारी सकाळी अकरा वाजता प्रश्नोत्तराचा तास सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठवाड्यातील दुष्काळी स्थितीची चर्चा सुरू करण्याची मागणी केली. त्याचवेळी शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांनी याकूब मेमनची फाशी रद्द करण्याच्या काँग्रेस आमदारांवर जोरदार टीका केली. भाजप-शिवसेनेच्या सदस्यांनी या वेळी कॉँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. मात्र अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्याकडे दुर्लक्ष करत
प्रश्नोत्तरे सुरू केली. मात्र सत्ताधा-यांचा गोंधळ थांबला नाही.गोंधळ सुरू असतानाच काँग्रेस सदस्यांची भ्रष्टाचारी मंत्र्यांची चर्चा सुरू करण्याची मागणी कायम ठेवली. मात्र,
त्याला अध्यक्षांनी मान्यता न दिल्याने विरोधकांनी सभात्याग केला. शिवसेनेचे सदस्यसुद्धा अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत येऊन घोषणा देत राहिले. या गोंधळामुळे अध्यक्षांना वेळोवेळी सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.

दुष्काळी चर्चेवर गंडांतर
‘याकूब-सलमान'मुळे मराठवाड्यातील दुष्काळाची चर्चा लटकली. मराठवाड्यातील आमदारांनी आठवड्यापूर्वी या संदर्भात स्वतंत्र चर्चेची मागणी केली होती. त्यानुसार आमदार प्रशांत बंब यांना चर्चेची सुरुवात करण्याची सूचना अध्यक्षांनी केली. बंब बोलण्यासाठी उभे राहिले असतानाही शिवसेना सदस्यांचा गोंधळ सुरू राहिल्याने सभागृहाचे कामकाज गुरुवारपर्यंत स्थगित झाले.
छायाचित्र: गुलाबराव पाटील