मुंबई- नवनीत प्रकाशन संस्थेचे संस्थापक डुंगरशीभाई रामजी गाला (८२) यांचे बुधवारी रात्री मुंबईत निधन झाले. गुरुवारी सकाळी चंदनवाडीतील विद्युत दाहिनीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली आणि नातू असा परिवार आहे. १९५५ मध्ये गिरगावात एक छोटासा छापखाना आणि गाइड प्रकाशनाचा उद्योग गाला बंधू यांनी सुरू केला हाेता. आज सुमारे सहा दशकांनंतर या कंपनीचे रूपांतर नवनीत पब्लिकेशन्स (इंडिया) लिमिटेड अशा मार्केट लिस्टेड कंपनीमध्ये झाले. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये हा ब्रँड घरोघरी पोहोचला आहे गाइड आणि शालेय अभ्यासक्रमावर आधारित पुस्तके यांचा दोन राज्यांतील जो मार्केट शेअर आहे, त्यापैकी ८० टक्के नवनीतचा आहे. याचे श्रेय डुंगरशीभाई यांना जाते. गावोगावी आणि तालुक्याच्या ठिकाणी फिरून त्यांनी आपली उत्पादने लोकप्रिय केली. डुंगरशीभाई यांनी मुंबईस्थित कच्छी समाजासाठीही भरपूर सामाजिक काम केले आहे.