आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेखकाचे खरे तारणहार वाचकच : भालचंद्र नेमाडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘लेखक असताना आधी स्वत:च्या लेखनाविषयी अभिमान वाटतो, मग प्रकाशकांविषयी, नंतर समीक्षकांविषयी वाटतो. या सगळ्यांशी फाटले की तेच लोक लेखक मंडळींना नकोशे वाटतात. सरतेशेवटी लेखकांचे खरे तारणहार त्यांचे वाचक आहेत. कलाकृतीतून वाचकाला आनंद देण्याची वृत्ती असली पाहिजे’, असे मत ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले.

मोठा मांडव नाही, लाखो रुपयांची उधळण नाही, वादाचे गालबोट नाही अशा पोषक वातारणात युनिक फीचर्सच्या ‘ई - साहित्य संमेलनाचे उद्घाटन पहिल्यांदाच मुंबईत अध्यक्ष भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे www.uniquefeatures.in या संकेतस्थळावर आजपासून ई - साहित्य संमेलन सर्वांसाठी खुले झाले असल्याची माहिती युनिक फीचर्सचे व्यवस्थापकीय संचालक आनंद अवधानी आणि संपादक डॉ. सुहास कुलकर्णी यांनी दिली.
‘रुढ साहित्य संमेलनाला फाटा देऊन नवा मार्ग चोखाळून येणाºया पिढीसाठी मराठी लेखकांचे भांडार उपलब्ध करून देण्याबाबत युनिक फीचर्स यांचे आभार मानले पाहिजेत. लेखन करणाºयांची संख्या प्रचंड वाढली आहे, असे लेखक रत्नाकर मतकरी यांनी सांगितले. लिखित मजकुराबरोबरच आॅडिओ आणि व्हिडिओ स्वरुपात घरबसल्या उत्तमोत्तम दर्जाचे साहित्य उपलब्ध झाल्याने भारतातूनच नव्हे तर अमेरिका, इंग्लंड, नायजेरिया, जर्मनी, हाँगकाँग, जपान, चीन आदी 25 हून अधिक देशांमधून ई - साहित्य संमेलनाचा आस्वाद वाचक घेऊ शकतात.

लेखक - कवींचे वेब डॉक्युमेंटेशन- मराठी साहित्यविश्व समृद्ध करणा-या दहा दिवंगत लेखक - कवींचे वेब डॉक्युमेंटेशन युनिक फीचर्सतर्फे करण्यात आले आहे हे या ई - साहित्य संमेलनाचे वेगळेपण आहे. ही माहिती मराठी व इंग्रजीत उपलब्ध असेल. ई - साहित्य संमेलनाव्यतिरिक्त मराठीतील दिग्गज कवी आणि लेखकांची माहिती इंटरनेटवरही आणण्याचे काम युनिक फीचर्स सुरू ठेवणार आहे, अशी माहिती या वेळी देण्यात आली.