आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Each District Have Hospital For Woman, New Born Child

प्रत्येक जिल्ह्यात महिला, नवजात शिशू रुग्णालय होणार स्थापन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील गर्भवती मातांना उत्कृष्ट आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महिला व नवजात शिशू रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. औरंगाबाद येथे 200 खाटांचे रुग्णालय बांधण्यात येणार आहे.


राज्यात सध्या फक्त आठ महिला रुग्णालये आहेत. ग्रामीण भागातील महिलांना गर्भारपणाच्या काळात योग्य औषधे आणि जेवण मिळत नसल्याने अनेकदा गर्भपात होतात वा कमी वजनाची कुपोषित बालके जन्माला येतात. या महिलांना जवळ रुग्णालय नसल्याने वेळेवर रुग्णालयात पोहोचणेही कठीण जाते. राज्यातील महिला व बालक रुग्णालयांची संख्या वाढवण्याबाबत राज्य सरकार विचार करत होते.


सूत्रांनी सांगितले की, राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यांमध्ये अशी रुग्णालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आगे. त्यानुसार लवकरच औरंगाबाद येथे 200 खाटांचे तर सोलापूर, जळगाव, अहमदनगर, वर्धा, भंडारा, हिंगोली, यवतमाळ, बुलडाणा, सातारा, सांगली, धुळे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, येथे 100 खाटांचे रुग्णालय सुरू केले जाणार आहे. याबाबतचा सविस्तर आराखडा तयार केला जात असून अर्थ विभागाकडे मंजुरीसाठी हा आराखडा पाठवला जाणार आहे.


रुग्णालयांची निर्मिती जनगणनेनुसार केली जाते. राज्यात सध्या 2001 च्या जनगणनेवर आधारित रुग्णालये स्थापन करण्यात येतात. त्यानुसारच बृहत आराखडाही तयार करण्यात येतो. परंतु आता लोकसंख्या वाढल्याने ग्रामीण भागात रुग्णालय सुरु करताना लोकसंख्येचा निकष अन्यायकारक असल्याचे सरकारच्या निदर्शनास काही संस्थानी आणून दिले आहे. त्यानुसार राज्य सरकारने वाढलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणात नवी रुग्णालये स्थापन करण्याचा विचार केला जात आहे. ही रुग्णालये सुरु झाल्यानंतर ग्रामीण भागातील गर्भपात आणि कुपोषित मुलांची संख्या कमी होईल असेही सूत्रांनी सांगितले.