आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Each Ganesh Mandal Demanding Lalbaugcha Raja In Mumabi

मुंबईतील प्रत्येक गणेश मंडळाला हवाय लालबागचा राजा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अवघ्या आठ दिवसांवर गणेशोत्सव आल्याने श्रींच्या आगमनाची तयारी जोरात सुरू झाली आहे. मात्र, ‘लालबागच्या राजा’ने घातलेल्या मोहिनीमुळे अनेक गणेश मंडळांमध्ये आपल्या गणपतीला ‘राजा’ची उपाधी देण्यास सुरुवात केली आहे. इतकेच नाही, तर लालबागच्या राजासारख्याच सिंहासनाधिष्ठित गणपती मूर्तींची संख्या यंदा 50 ते 60 टक्क्यांनी वाढली असल्याचे दिसून आले आहे.

साधारणपणे 1986 ते 90 पर्यंत सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये वेगवेगळ्या रूपांतील गणेशाच्या उभ्या मूर्तींची मागणी जास्त असायची. परंतु लालबागच्या राजाची प्रसिद्धी झाल्यानंतर गेल्या पाच-सहा वर्षांत बैठय़ा आणि विशेषकरून सिंहासनारूढ गणपती मूर्तींचा एक नवा ट्रेंड चांगलाच रुजला असल्याचे मूर्तिकार शशिकांत बागवे यांनी ‘दिव्य मराठी’ला माहिती देताना सांगितले.

बैठय़ा मूर्तींना मागणी
पूर्वीच्या काळी उभ्या मूर्तीची स्थापना करून आसपास देखावा करण्यात येत असे; परंतु आता त्याला फाटा देण्यात आला आहे. अगदी हुबेहूब लालबागच्या राजाचा गणपती नसला तरी चालेल; पण आसन आणि सिंहासनाचा लूक मात्र राजासारखाच हवा असा गणेशभक्तांचा आग्रह असतो, असेही बागवे म्हणाले.

लालबागच्या राजाच्या धर्तीवर बैठय़ा मूर्तींचे सार्वजनिक गणेशोत्सवांचे हे प्रमाण 60 टक्के आहे. केवळ सार्वजनिकच नाही, तर दीड, अडीच फुटांच्या घरगुती गणपती मूर्तींचे हे प्रमाण 40 टक्क्यांच्या आसपास असल्याचे बागवे म्हणाले.

गणपतीची बैठी मूर्ती इतरांपेक्षा वेगळी हवी, असा मंडळांचा आग्रह असतो; पण सिंहासनावर आरूढ झालेल्या गणरायाला आणखी किती वेगळी पोझ देणार, असा सवाल गणेशमूर्तींचे रेखाचित्र काढणारे प्रसिद्ध चित्रकार प्रकाश लहाने यांनी केला. गणपती वेगळा दिसावा यासाठी सिंहासनाच्या प्रभावळीवर वेगवेगळ्या प्रकाराचे हिरे कोंदणात बसवून शोभा वाढवण्याचा प्रयत्न केला जातो, असेही ते म्हणाले.


गरुडावरील गणेश मूर्तींसाठीही आग्रह
जळगाव, बेळगाव, सुरत, गुजरात या भागात बैठय़ा गणपतींचे महत्त्व होते; पण येथे आता गरुडावरचा गणपती, बालगणेश, शंकर-पार्वतीच्या सोबत असलेला अशा विविध प्रकारच्या गणरायाच्या मूर्तींची मागणी वाढली आहे. पूर्वी हे चित्र मुंबईत बघायला मिळायचे, पण आता ते मुंबईच्या बाहेर बघायला मिळत आहे. प्रकाश लहाने, मूर्तिकार

सिंहासनाधिष्ठित मूर्तींच्या संख्येत 60 टक्के वाढ
पावले सोन्याचीच हवीत
लालबागच्या राजाला सोन्याची पावले असल्याने आपल्या घरच्या गणपतीलादेखील सोन्याची पावले करण्याची नवी परंपरा आता सुरू झाली असल्याचे लहाने म्हणाले. लालबागच्या राजावर पावलावर पाऊल टाकत अनेक गणेशोत्सव मंडळांमध्ये अमुक गल्लीचा, विभागाचा राजा, महाराजा, सम्राट, महासम्राट अशी उपाधी देण्याचा कलही खूप वाढला असल्याचे बागवे म्हणाले.