मुंबई - स्वच्छ भारत मिशनच्या धर्तीवर राज्यातही स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवण्यात येत अाहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या चार वर्षांत म्हणजेच २०१९ पर्यंत राज्यातील शहरी भागात प्रत्येक घरात शाैचालय उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट सरकारने समाेर ठेवले अाहे.
अाजही राज्यातील नागरी भागातील सुमारे २७ टक्के कुटुंबांकडे शाैचालय नसल्याचे सरकारी अहवालातून समाेर अाले अाहे. त्यामुळेच ही याेजना युद्धपातळीवर राबवली जाणार अाहे. मात्र ज्यांच्याकडे शाैचालये बनविण्यासाठी जागा नसेल अशा लाेकांसाठी सरकारी जागेवर सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्याचाही सरकारचा प्रस्ताव अाहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला प्रारंभ केला. हे अभियान २ अाॅक्टाेबर २०१९ पर्यंत चालणार अाहे.
केंद्राकडून १२१६ काेटी
केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानानुसार, राज्यात उघड्यावर शाैचास जाणाऱ्या प्रत्येक कुटुंबालाच शाैचालयाची व्यवस्था करून दिली जाणार अाहे. या स्वच्छता अभियानासाठी केंद्राकडून राज्याला १२१६.४० काेटींचा निधी देण्यात येणार अाहे.