आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढच्या वर्षी लवकर या! लालबागच्या राजाला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गेले दहा दिवस भक्तांच्या मनात घर करून राहिलेल्या गणपती बाप्पाला रविवारी सर्वत्र उत्साहात भावपूर्ण निरोप देण्यात आला. अनंत चतुर्दशीच्या पर्वावर विसर्जन मिरवणुकीदरम्यान मुंबईतील सुपरिचित लालबागचा राजा मंडळाची मूर्ती गिरगाव चौपाटीवर आली असता त्याच्या दर्शनासाठी गणेशभक्तांनी अशी गर्दी केली होती. लालबागच्या राजाची देखणी छबी आपल्या मोबाइलमध्ये टिपण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही.
१३ हजारांवर मूर्तींचे विसर्जन
बाप्पांना निरोप देण्यासाठी अवघी मुंबईनगरी नटली होती. विसर्जनाची व्यवस्था पाहण्यासाठी पालिकेचे दीड हजार कर्मचारी आज चौपाटी तसेच इतर विसर्जन स्थळांवर तैनात करण्यात आले आहेत. तसेच, विसर्जन सोहळ्याला गालबोट लागू नये म्हणून ३५ हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. गिरगाव चौपाटीवर या वर्षी १३ हजारांहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन होण्याचा अंदाज असून, किनाऱ्यावरील वाळूमध्ये वाहन अडकून पडू नये यासाठी दोनशेहून अधिक लोखंडी फळ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मुंबईतील महापौर बंगल्यातील कृत्रिम तलावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरच्या गणपतीचे विसर्जन केले.
अकोला - ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या गजरात मुंबई, विदर्भासह राज्यभरात गणेश विसर्जन करण्यात आले. भक्तांकडे पाहुणचार घेऊन घरी निघालेल्या लाडक्या गणपतीला निरोप द्यायला राज्यभरात तलाव आणि किनाऱ्यांवर भक्तांची गर्दी उसळली होती.
नागपूर - विदर्भातही लाडक्या गणेशाला नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, यवतमाळ, बुलडाणा, भंडारा, गोदिंया, वाशीम, गडचिरोली, खामगाव येथे निरोप देण्यात आला. गृहिणींनी मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळी काढली होती. गुलाल उधळला जात होता. दरम्यान, राज्यात सर्वाधिक काळ चालणारी मिरवणूक म्हणून मान असलेल्या वाशीमच्या गणेश मिरवणुकीलाही ८.३० वाजता सुरुवात झाली आहे. ही मिरवणूक तब्बल ४८ तास चालते. खासदार भावना गवळी, पोलिस अधीक्षक विनीता साहू, आमदार राजेंद्र पाटणी, लखन मलिक यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. दरम्यान, ढोल-ताशांच्या तालावर खासदार गवळी यांचे पाय थिरकले.

पहिल्या आणि दुसऱ्या गणपतींचे हौदात विसर्जन
पुणे- देशभराचे लक्ष असलेली पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात झाली होती. पहिल्या आणि दुसऱ्या गणपतीचे हौदात विसर्जन करण्यात आले. यंदा नदीवर विसर्जनसाठी १७४ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती, तसेच मानाच्या गणपतींसाठी वेगळा हौद आणि इतर गणपतींसाठी वेगळे हौद तयार करण्यात आले होते. तसेच इच्छेप्रमाणे भाविकांना नदीमध्येही विसर्जन करता येणार आहे. दरम्यान, विसर्जन मिरवणुकीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर कसबा गणपतीची मिरवणूक सुरू झाली. मानाचे पहिले तीन गणपती म्हणजे कसबा, तांबडी जोगेश्वरी आणि गुरुजी तालीम या मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन डेक्कनजवळील नटेश्वर घाट याठिकाणी तयार करण्यात आलेल्या हौदात करण्यात आले, तर तुळशीबाग आणि पाचवा केसरीवाडा या मानाच्या उर्वरित दोन गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई आणि मंडई मंडळाच्या मूर्ती खंडूजीबाबा चौकाजवळ पांचाळेश्वर घाटावर विसर्जित करण्यात आल्या.
औरंगाबाद - ढोल-ताशांचा निनाद, उधळला जाणारा गुलाल, डीजेच्या तालावर थिरकणारी पावले, अशा उत्साहात मराठवाड्यात औरंगाबादसह नांदेड, लातूर, परभणी, बीड, उस्;मानाबाद, हिंगोली, जालना या जिल्ह्यांत गणेश विसर्जन करण्यात आले.

कोल्हापूर- कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यांतही बाप्पांच्या मिरणुकीला सुरुवात झाली आहे. अहमदनगरमध्ये बाप्पांचे विसर्जन करण्यासाठी कल्याण रोडवरील बाळजीबुवा विहीर व सावेडी येथील यशोदानगर परिसरातील विहिरीवर गणेशभक्तांची गर्दी झाली होती. कोल्हापूरचा राजाचेही पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशे पथकं बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज होती.

नाशिक- उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांतही विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशांच्या निनादात गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला.