आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज रात्री 8.30 ते 9.30 बंद ठेवा वीज दिवे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- जागतिक हवामान बदलांमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर मात करण्यासाठी पारंपरिक ऊर्जेऐवजी दैनंदिन व्यवहारात अपारंपरिक ऊर्जेचा (रिन्युएबल एनर्जी) वापर सर्वांनीच वाढवायला हवा, असे आवाहन प्रख्यात बॉलीवूड अभिनेता अजय देवगण यांनी शुक्रवारी केले. या समस्येबाबत जागृती निर्माण करण्यासाठी शनिवारी (23 मार्च) जगभरातील उद्योग तसेच नागरिकांनी आपापल्या देशांत स्थानिक वेळेनुसार रात्री 8.30 ते 9.30 या एक तास अनावश्यक वापरातील विजेचे दिवे बंद ठेवावेत यासाठी वर्ल्डवाइड फंड (डब्ल्यूडब्ल्यूएफ) या संघटनेने‘अर्थ अवर’ या चळवळीच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. या मोहिमेत ‘दैनिक भास्कर’ समूह अग्रक्रमाने सहभागी झाला आहे.

अजय देवगण ‘अर्थ अवर’ या मोहिमेचा भारतातील अग्रदूत आहेत. अंधेरी येथील ‘आयटीसी ग्रँड मराठा’ हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत देवगण यांनी सांगितले की, ‘आपण पृथ्वीचा उल्लेख धरती माँ असा करतो. देशाचा उल्लेख मायभूमी असा करतो. आई ज्याप्रमाणे लेकरांची काळजी घेते तीच भूमिका पृथ्वी मानवी समूहाबाबत निभावत असते. पृथ्वी उदारहस्ते मानवाला आवश्यक संसाधने पुरवते. मात्र, आपण त्यांची नासाडी चालवली आहे. त्यामुळे भविष्य अंधकारमय होण्याचा धोका आहे. जागतिक हवामान बदलांमुळे अनेक आपत्ती ओढवत आहेत. त्यांचा मुकाबला करण्यासाठी ऊर्जा व संसाधनांचा वापर जपून करणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘अर्थ अवर’ मोहिमेच्या माध्यमातून लोकजागृतीचे काम हाती घेण्यात आले आहे.’ याप्रसंगी डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडियाच्या पदाधिकारी आरती खोसला यांनीही मनोगत व्यक्त केले.

‘अर्थ अवर’ची पार्श्वभूमी : वर्ल्ड वाइल्ड फंडच्या ‘अर्थ अवर’ मोहिमेचा प्रारंभ 2007 मध्ये सिडनी येथे झाला. या मोहिमेत भारत 2009 मध्ये सहभागी झाला. त्या वर्षी देशातल्या 56 शहरांतील 5 दशलक्ष नागरिकांनी अनावश्यक वापरातील विजेचे दिवे एक तास बंद ठेवून आपला सहभाग नोंदवला. त्यानंतरच्या कालावधीत या मोहिमेत देशभरातून सहभागी होणाया नागरिकांच्या संख्येत 40 टक्के वाढ झाली. 23 मार्च 2012 रोजी भारतामध्ये 200 शहरांमधील नागरिक व उद्योगसमूह रात्री 8.30 ते 9.30 या काळात विजेचे
दिवे बंद ठेवून मोहिमेत सहभागी झाले होते. शेकडो शैक्षणिक संस्था, 100 ख्यातनाम सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील संस्था, अनेक राज्य सरकारे, त्याप्रमाणे 10 लाखांहून अधिक विद्यार्थी ‘अर्थ अवर’ या मोहिमेत दरवर्षी सहभागी होत असतात.

सौरऊर्जेवर चालतात माझ्या घरातील दिवे व उपकरणे...: ऊर्जेचा जपून वापर करणे तसेच अपारंपरिक ऊर्जेचा वापर प्रत्यक्ष व्यवहारात करण्यावर अभिनेता अजय देवगणने कटाक्ष ठेवला आहे. याबाबत केवळ लोकांना उपदेश करत न बसता तो ‘बोले तैसा चाले’ वृत्तीने वागणारा आहे. पत्रकारांशी बोलताना देवगण यांनी सांगितले की, ‘माझे निवासस्थान, फार्महाऊस येथील विजेचे दिवे, गृहोपयोगी उपकरणे तसेच गार्डनमधील दिवे सौरशक्तीच्या माध्यमातून चालण्याची व्यवस्था मी करून घेतली आहे. असा एक प्रकल्प गुजरातमध्ये तेथील सरकारच्या सहकार्याने मी सुरू केला आहे. महाराष्ट्र सरकारने जर सहकार्य देऊ केले तर या राज्यातही सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारण्यात मी पुढाकार घेईन.’ अपारंपरिक विजेच्या वापराचे फायदे आपल्या मुलांनाही सांगितले असल्याचे देवगण म्हणाले.

मोहिमेची मुख्य उद्दिष्टे- घरातील उपकरणे शक्यतो अपारंपरिक ऊर्जेवर चालवण्यावर कटाक्ष ठेवायला हवा.
- उद्योगांनी अपारंपरिक ऊर्जेने उत्पादन व व्यावसायिक प्रक्रिया पार पाडण्यास अग्रक्रम द्यावा.
- अपारंपरिक ऊर्जेची निर्मिती व वापरासाठी प्रोत्साहन देणारी धोरणे सरकारने आखावीत व अमलात आणावीत.
‘दिव्य मराठी’चा पुढाकार- ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम रोखण्यासाठी 23 मार्च रोजी रात्री 8.30 ते 9.30 दिवे बंद करण्याचे आवाहन वर्ल्डवाइड फंड फॉर नेचरने केले आहे. या मोहिमेला ‘अर्थ अवर’ असे नाव देण्यात आले आहे. या मोहिमेत दैनिक दिव्य मराठी, भास्कर समूह डब्ल्यूडब्ल्यूएफचा भागीदार आहे.