आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • EC Announces Assembly Election Schedule; Haryana, Maharashtra

आघाडीला बोनस की युतीला सत्तेची संधी? वाचा, विधानसभा निवडणुकीची वैशिष्ट्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अखेर निवडणुकीचा बिगुल वाजला आणि वाटाघाटींमध्ये मरगळलेल्या राजकीय वातावरणात एकदम उत्साहाचे वारे शिरले. महायुतीत अर्थातच हा उत्साह जास्त आहे तर अभ्यास न झालेल्या मुलाची परीक्षा जवळ आल्यावर जशी स्थिती होते तशी स्थिती काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये आहे. दिवाळीच्या आदल्या आठवड्यात १५ ऑक्टोबरला मतदान होईल आणि वसुबारसेच्या उंबरठ्यावर निकालाचे फटाके फुटतील. राज्यातील सत्तेवर १५ वर्षे मांड टाकून बसलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्तेची खुर्ची डगमगताना दिसत आहे. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्तेची पाळेमुळे खोलवर रुजलेली असल्यामुळे महायुतीसमोरही अडथळे उभे आहेत.

गोपीनाथ मुंडे व विलासराव देशमुख यांच्या पश्चात होणारी ही पहिलीच निवडणूक. त्याहून महत्त्वाचे म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मुलुखमैदानी तोफ या यावेळी गाजणार नाही. त्यांच्यानंतरही शिवसेनेचा जोर ओसरला नसला तरी खरा फायदा मात्र होतो आहे तो भाजपला. नरेंद्र मोदी यांचा लोकसभा निवडणुकीतील झंझावात कमी झाला खरा, पण जनतेतील मोदी प्रेम अद्याप कायम आहे. कार्यकर्त्यांची उणीव ही भाजपपुढील प्रमुख अडचण, तर कार्यकर्त्यांची फौज असूनही ठाकरी नेतृत्वाचा अभाव ही शिवसेनेपुढील काळजी यामध्ये महायुती अडकली आहे. दुसरीकडे शरद पवार यांचे पक्के राजकारणी नेतृत्व असले तरी मतदारांचा राष्ट्रवादी काँग्रेसवरील अविश्वास व भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे पवारांची चतुराई या वेळी कामी येण्याची शक्यता कमी आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वच्छ नेतृत्व ही काँग्रेसची मोठी जमेची बाजू. पण कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून अजून सावरलेले नाहीत.

अशा संमिश्र वातावरणात निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय तंबूंमध्ये लगबग सुरू झाली आहे. प्रचारासाठी अवघे १३ दिवस मिळणार आहेत. जागावाटपाची अडलेली बोलणी मार्गी लावणे हे दोन्ही आघाड्यांसमोरील पहिले मोठे आव्हान आहे. पुढील दोन दिवस त्यामध्ये जातील आणि पितृपंधरवडा उलटल्यावर खर्‍या अर्थाने प्रचाराला सुरुवात होईल.

२७ सप्टेंबरपर्यंत मतदार नोंदणी
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच २७ सप्टेंबरपर्यंत मतदार नोंदणी करता येईल. लोकसभा निवडणुकीत मतदार म्हणून नोंद असली आणि मतदान केलेले असले तरीही मतदारांनी निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावर जाऊन मतदार यादीत आपले नाव आहे, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.

पुढे वाचा, दिग्गजांच्या नेतृत्वाची लागणार कसोटी....