आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजबळांच्या कंपनीतील संचालकालाच माफीचा साक्षीदार करण्याचा ईडीचे प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महाराष्ट्र सदन आणि इंडिया बुल्स प्रकरणात 870 कोटींची बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी तुरुंगाची हवा खात असलेल्या भुजबळांच्या कंपनीतीलच एका संचालकाला माफीचा साक्षीदार करण्याचा ईडीचा प्रयत्न आहे. भुजबळांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या कंपनीतील संचालकाला माफीचा साक्षीदार बनविल्यास करोडो रूपयांची विल्हेवाट कशी लावली याचे कोडे उलगडणार असल्याचे ईडीच्या अधिका-याचे म्हणणे आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यापासून तुरूंगात असलेल्या छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या चौकशीतून मात्र ईडीला कोणतेही पुरावे अद्याप न मिळाल्यानेच ईडीला आता साक्षीच्या माफीदाराची गरज भासत आहे. ईडीने भुजबळ कुटुंबियांवर आरोपपत्र दाखल केले आहे. मात्र, हे आरोपपत्र कोर्टात टिकवायचे असेल तर ईडीकडे सक्षम पुरावे हवे आहेत. जे अद्याप ईडीला मिळाले नसल्याचे स्पष्ट करते.
महाराष्ट्र सदन प्रकरणी भ्रष्टाचार झाल्याचे व त्यातून पैशाची अफरातफर झाल्याचे सांगत एसीबी व ईडीने भुजबळ कुटुंबियांविरोधात कारवाई केली आहे. समीर भुजबळ फेब्रुवारीपासून तर छगन भुजबळ मागील महिन्यापासून तुरुंगात आहेत. यादरम्यान, ईडी व इतर तपास यंत्रणांनी त्यांची कसून चौकशी केली. मात्र, या तपासयंत्रणांना दोन्ही चुलते-पुतण्यांनी दाद दिली नाही. या दोघांच्या चौकशीतून तपासयंत्रणांच्या हाती काहीही पुरावे मिळाले नाहीत.
ईडीने भुजबळांच्या जवळचे कंत्राटदार अशोका बिल्डकॉनवर छापे टाकले व कंत्राटदार अशोक कटारिया यांची सलग तीन दिवस चौकशी केली. मात्र, त्यातूनही फार काही हाती लागत नसल्याने ईडीचे अधिकारी चक्रावले आहेत. आरोपपत्र दाखल केल्याने त्याबाबत पुरावे गोळा करणे गरजेचे आहे. कारण कोर्टात एकदा केस सुरु झाली की तपासयंत्रणांना पुरावे सादर करावे लागतील. तसे न झाल्यास ईडीचे नाचक्की होईल व भुजबळ मोकळे सुटतील. असे झाल्यास तपासयंत्रणांसोबत राज्य सरकार तोंडघाशी पडण्याची भीती आहे. त्यामुळेच ईडी आता सावध पावले टाकत आहे. त्यामुळे ईडीने नवा डाव आखत भुजबळांच्या कंपनीतील संचालकाच माफीचा साक्षीदार बनविण्याचे प्रयत्न आहेत. आता या प्रयत्नात ईडीला किती यश मिळते यावरच भुजबळांचे भवितव्य ठरेल.
बातम्या आणखी आहेत...